पुणे- पुणे बुक फेअर ( Pune Book Fair ) अर्थात पुणे पुस्तक 19 व्या जत्रेला गुरुवारी (दि. 28 एप्रिल) पुण्यात प्रारंभ झाला. महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी असलेल्या पुणे शहरात हा उपक्रम राबवला जात आहे. पुणेकर रसिकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. पुण्यातील येरवडा परिसरात असलेल्या क्रिएटी सिटी मॉलमध्ये भरलेल्या यंदाच्या या बुक फेअरचे उद्घाटन प्रसिद्ध साहित्यिक अशोक कामत यांच्या हस्ते झाले.
पुणे बुक फेअर ही भविष्यात व्यापक चळवळ व्हावी आणि जीवन मुल्यांचे दर्शन त्यातून घडावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. यंदाच्या या प्रदर्शनात 40 हून अधिक दालने असून त्यात देशभरातील नामांकित प्रकाशन संस्थांचा समावेश आहे. याशिवाय केंद्र सरकारचा प्रकाशन विभाग, जनगणना संचालनालय त्याचबरोबर आकाशवाणी आणि शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यासारख्या सरकारी विभागांची दालने या प्रदर्शनात आहेत.
केंद्र सरकारच्या प्रकाशन विभागाच्या दालनात 250 हून अधिक विविध विषयांवरील किमान 10 हजार पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. इतिहास, कला, साहित्य, संस्कृती, अर्थ, विज्ञान, आरोग्य आणि क्रीडा, गांधी साहित्य, बालसाहित्य यासह मान्यवरांची चरित्र त्याचबरोबर नेत्यांची गाजलेली भाषणे याबद्दलचे विपुल साहित्य या दालनात उपलब्ध आहे. या पुस्तक जत्रेच्या काळा 10 टक्यांपासून 90 टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे.
जनगणना संचालनालयाच्या दालनात 1872 पासून 2011 पर्यंतच्या जनगणने विषयीची काही प्रकाशने पुस्तक आणि सीडीच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यावर 20 टक्केपर्यंत सवलत दिली जाणार आहे. शिवाय या दालनाला भेट देणाऱ्यासाठी विशेष स्पर्धेचा आयोजन करण्यात आले असून प्रोत्साहनपर बक्षिसेही दिली जाणार आहेत. 1 मेपर्यंत रोज सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत हे प्रदर्शन रसिकांसाठी खुल राहणार आहे .
हेही वाचा -Pune Mosque : पुण्यातील 'या' पाच मशिदींचा मोठा निर्णय!