पुणे - ज्येष्ठ प्रकाशक अरुण जाखडे यांचे आकस्मिक निधन झाले ( Arun Jakhade Passed Away ) आहे. ते 65 वर्षाचे होते. त्यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रातून दु:ख व्यक्त केले जात आहे. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे.
अरुण जाखडे हे एक मराठी ग्रंथप्रकाशक आणि लेखक होते. पद्मगंधा ही त्यांची प्रकाशनसंस्था होती. त्यांनी गणेश देवी, रा.चिं. ढेरे, व.दि. कुलकर्णी अशा मराठीतील अनेक लेखक-संशोधकांचे ग्रंथ या प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून प्रसिद्ध केले होते. त्याशिवाय त्यांनी विविध वृत्तपत्रात 5 वर्षांहून अधिक काळ सातत्याने लेखन केले आहे. 'पद्मगंधा' आणि 'आरोग्य दर्पण' हे दिवाळी अंक त्यांच्या संपादकत्वाखाली निघत असत.
श्रीतुळजाभवानी ग्रंथ केले प्रकाशित
भारताचा स्वातंत्र्यलढा, भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण, विश्वरूपी रबर, शोधवेडाच्या कथा आदी विपूल साहित्य अरुण जाखडे यांनी प्रकाशित केले आहे. प्रख्यात लेखक खुशवंत सिंग यांच्या इंग्रजी कथासंग्रहाचा मराठी अनुवाद पद्मगंधातर्फे प्रकाशित करण्यात आला होता. महाराष्ट्राची कुलस्वामिनी, भाग्यविधाती, सर्जक आणि संगोपक अशी श्रीतुळजाभवानीमातेच्या प्राचीन मिथकाची प्रेरकता उलगडणारा डॉ रा.चि.ढेरे लिखीत श्रीतुळजाभवानी हा ग्रंथ देखील पद्मगंधातर्फे प्रकाशित करण्यात आलेला.
आठवड्यात दुसरा जिद्दी प्रकाशक गेला
अरुण जाखडे यांचे जाणे ही फारच धक्कादायक बातमी आहे. माझे ते वीस वर्षांपासूनचे मित्र होते. सुनील मेहतांच्या शोकसभेला ते उपस्थित होते, तेव्हा असे काही होईल असे कोणालाच वाटले नसेल. दर्जेदार, वैचारिक, समीक्षात्मक पुस्तकांच्या प्रकाशनाचेएक अत्यंत अवघड काम अरुण जाखडे यांनी पद्मगंधाच्या स्थापने पासून पेलले. आठवडाभरात दुसरा मोठा जिद्दी प्रकाशक गेला, ही खरोखरच प्रकाशन व्यवसायाची फार मोठी हानी आहे, अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष आणि दिलीपराज प्रकाशनचे संचालक राजीव बर्वे यांनी दिली.