पुणे :सुरूवातीच्या काळात आपल्याकडे तयार होणारी लस ही परदेशात देण्याची काहीही गरज नव्हती. ती आपल्या देशातील नागरिकांनाच जर प्राधान्याने दिली असती तर आता जी लसीची कमतरता भासत आहे, ती जाणवली नसती असे परखड मत व्यक्त करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. अजित पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त पुणे येथील विधानभवन आवारात ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
'लस सुरूवातीला परदेशात देण्याची काहीच गरज नव्हती'
महाराष्ट्रात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांची लोकसंख्या 5 कोटी 71 लाख एवढी आहे. आम्ही 6 कोटी लसीकरणाच्या हिशोबाने दोन्ही डोस लक्षात घेत 12 कोटी लसीकरणाला मंजुरी दिली आणि त्यासाठी एकरकमी पैसेही भरण्याची तयारी दर्शवली होती. तसं नियोजन ही केलं होतं. पण लस देण्याचा पूर्ण अधिकार केंद्राने आपल्या हाती घेतला आहे.
सीरमने महाराष्ट्राला अधिकची लस द्यावी
महाराष्ट्रात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांची लोकसंख्या 5 कोटी 71 लाख एवढी आहे. आम्ही 6 कोटी लसीकरणाच्या हिशोबाने दोन्ही डोस लक्षात घेत 12 कोटी लसीकरणाला मंजुरी दिली आणि त्यासाठी एकरकमी पैसेही भरण्याची तयारी दर्शवली होती. तसं नियोजन ही केलं होतं. पण लस देण्याचा पूर्ण अधिकार केंद्राने आपल्या हाती घेतला आहे. आपल्या इथं सीरम आणि भारत बायोटेक या दोन कंपनीच्या लस तयार होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः अदर पुनावाला यांच्याशी बोलले आहे. सीरमचे प्लँट पुण्यात असल्याने अदर पुनावाला यांनी देशाकरता तर महत्त्वाची भूमिका बजावलीच पाहिजे पण महाराष्ट्रासाठीही महत्त्वाची भूमिका बजावत राज्याला अधिकची लस मिळेल यासाठी प्रयत्न करायला हवे असे अजित पवार म्हणाले. आपण एकावरच अवलंबून राहत नाही, तर सीरमबरोबर भारत बायोटेकचीही लस बुकिंग केली आहे असंही ते यावेळी म्हणाले.
राज्याला आजच्या दिवशी फक्त 3 लाख लस मिळाल्या
महाराष्ट्राला आजच्या दिवशी फक्त 3 लाख लस मिळाल्या असून पुणे जिल्ह्यासाठी फक्त 20 हजार लस देण्यात आल्या आहेत. पुणे शहरात 2 ठिकाणी, पिंपरी चिंचवडसाठी 3 ठिकाणी, आणि ग्रामीण भागात 13 ठिकाणी आणि कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये 1 ठिकाणी 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण करण्यात येणार आहे. आज, उद्या आणि परवा 45 वयोगटातील लोकांसाठी लसीकरण बंद असणार आहे. यापुढे तरुणांच लसीकरण वेगळं आणि ज्येष्ट नागरिकांचं लसीकरण वेगळं करण्यात येणार आहे असेही त्यांनी सांगितले.
परदेशातील लस आयात करण्याचेही प्रयत्न
आमचा प्रयत्न आहे की, केंद्र सरकारची परवानगी घेऊन विदेशात तयार होणारी लस आपल्याला कशा पद्धतीने मिळवता येतील. यासाठी देखील आम्ही प्रयत्न करत आहोत. याबाबत मुख्यमंत्री पंतप्रधानांशी बोलत आहे. तशी परवानगी मिळाली की आम्ही विदेशातूनही लस आयात करणार आहोत असंही पवार यावेळी म्हणाले.
केंद्रावर थोड प्रेशर आलंय
कोरोनाच्या पाहिल्या लाटेत महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून येत होते. पण दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रासह ज्या राज्यात सार्वत्रिक निवडणुका झाल्या, कुंभमेळा झाला त्या राज्यातही कोरोना रुग्ण वाढल्याने ऑक्सिजन, इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत गेली आहे.आणि त्या त्या राज्याचा विचार करून केंद्र निर्णय घेत आहे असंही यावेळी पवार म्हणाले.
महाराष्ट्र दिनाच्या दिल्या शुभेच्छा
यावेळी अजित पवारांनी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. खरं तर हा 61 वा वर्धापन दिन आहे. परंतु या पूर्ण वर्षभराच्या कार्यक्रमात हीरक महोत्सवी वर्ष असताना देखील कोरोनाने मागच्या वर्षीही काही कार्यक्रम करता आले नाही आणि या वर्षीही काहीही करता आलं नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.