पुणे -निकालानंतर अनेक दिवस सत्ता स्थापनेचं भिजत घोंगड पडले होते. अनुभवी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय खेळीने शिवसेना आणि दोन्ही काँग्रेस अनेक नाट्यमय घडामोडीनंतर एकत्र येत सत्ता स्थापन करण्याचे निश्चित झाले. शुक्रवारी रात्री पर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना सत्ता स्थापन करणार असल्याचे निश्चित झाले होते. मात्र, अनपेक्षितपणे अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने राज्यासह देशात खळबळ उडाली आहे.
अजित पवारांना या निर्णयाची मोठी किंमत मोजावी लागेल? राजकीय विश्लेषकांचे मत
अजित पवार यांनी भाजपशी हात मिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे .मात्र, या निर्णयाची मोठी किंमत मोजावी लागेल असे मत राजकीय विश्लेषकानी व्यक्त केले आहे .
अजित पवारांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात काय परिणाम होईल याबाबत राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, आज धक्कादायक आणि अनपेक्षितपणे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडवणीस व उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. या घडामोडींमुळे राष्ट्रवादीचे फार मोठे नुकसान होऊ शकते. हे ओळखून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तत्काळ पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली. राष्ट्रवादीच्या नाराज झालेल्या गटाची बैठक घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. वास्तविक पाहता शरद पवारांचे बोट धरून राजकारणात उतरलेले अजित पवार त्यांच्याच तालमीत तयार झालेले पैलवान असल्याने अजित पवार यांनी घेतलेला हा निर्णय सहजासहजी घेतलेला नसून जबाबदारीने घेतलेला हा निर्णय असू शकतो. असे मत राजकीय विश्लेषक व ज्येष्ठ पत्रकार अमर तोरणे यांनी व्यक्त केले.
पुढे ते असेही म्हणाले की, अजित पवारांना या निर्णयाची मोठी किंमत मोजावी लागेल. याची त्यांना जाणीव असेल. या विधानसभेला जो जनाधार पवार साहेबांनी निर्माण केला आहे.. तो जनाधार या निर्णयामुळे घटू शकतो. असे असले तरी तीस तारखेला बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपसह अजित पवारांना परीक्षा द्यावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.