पुणे - भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाचे औचित्य साधून देशभर विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून पुण्यातील बोनिसा ज्वेलर्सतर्फे ( Bonisa Jewelers ) यावर्षी 7,500 माजी सैनिकांना चांदी, सोने, हिरे आणि विविध राज्यांतील मातीपासून बनवलेल्या 'कमिटमेंट रिंग्ज' भेट देण्यासाठी 'एक इंडिया मिशन' सुरू ( One India Mission ) करण्यात आले आहे.
माजी सैनिकांना ही रिंग देण्यात येणार - पुण्यातील ‘बोनिसा’ ज्वेलर्सतर्फे हा उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमांतर्गत खडकी येथील पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटर (पीआरसी) येथील 88 माजी सैनिकांना 'एक इंडिया रिंग्ज' देण्यात आल्या आहेत. याची सुरुवात 26 जानेवारी रोजी करण्यात आली होती. देशभरातील विविध राज्यातील माजी सैनिकांना ही रिंग देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी संकेत बी बियाणी यांनी दिली.
ही आहे रिंग्जची खासियत - बोनिसाचे भागीदार असलेले सैनबाल ज्वेलरी एलएलपीचे संकेत बी बियाणी आणि त्यांचा भाऊ संदेश बियाणी, बहिण नेहा मुंद्रा यांनी वर्षभरापूर्वी या उपक्रमाबद्दल विचार करत, त्यादिशेने काम सुरु केले होते. एक इंडिया रिंग ही चांदी (जी आपल्याला शांत ठेवते), सोने (जे 'भारत'चे प्रतीक आहे), आपल्या देशातील प्रत्येक राज्यातील माती (एकतेसाठी) आणि हिरा (आपल्यापैकी प्रत्येकजण एक हिरा आहे) यांच्यापासून बनलेली आहे. ही अंगठी जगातील पहिली राष्ट्रासाठी समर्पित असलेली, देशाप्रती ‘वचनबद्धता’ दर्शविणारी अंगठी आहे आणि यावर्षी स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त ७५०० हून अधिक सैनिकांना ही अंगठी देण्याचे आमचे ध्येय आहे. ही अंगठी चांदीची आहे आणि त्यावर सोनेरी अक्षरात 'भारत' लिहिलेले आहे जे भारताचे 'सोने की चिडिया' असण्याचे प्रतीक आहे.आणि यात विशेष करून 29 राज्यातून माती आण्यात आली आहे. असे यावेळी संकेत बी बियाणी यांनी सांगितलं.