पुणे- जिल्ह्यातील विविध रुग्णालये, डेंटल क्लिनिकमध्ये म्यूकरमायकोसिसचे सुमारे एक हजार रुग्ण आढळले आहेत. या बुरशीची माहिती नसल्याने संसर्ग वाढत आहे. यामुळे वेळीच निदान, उपचार होत नसल्याने दात, वरचा जबडा, डोळे, दृष्टीवर परिणाम होत असून काही रुग्णांना प्राणदेखील गमवावे लागत आहेत. कर्करोगाच्या वाढीपेक्षा हा संसर्ग वाढण्याचा वेग दहापट आहे. सरकारने या संसर्गाची दखल घेऊन मार्गदर्शक तत्त्वे (एसओपी) तयार केली पाहिजे, असे मत डॉक्टर व्यक्त करत आहेत.
दंत शल्यचिकित्सक रुग्णाचे प्राण वाचवू शकतात -
कोरोना रुग्णांना म्यूकरमायकोसिसपासून वाचविण्यासाठी दक्ष राहणे आवश्यक असून फिजिशियन, कोरोना उपचार केंद्रे, डेंटल क्लिनिक, ओरल मॅक्सीलोफेशियल सर्जन (मुखशल्य चिकित्सक) नाक कान-घसा तज्ज्ञ, दंत शल्यचिकित्सक, न्यूरो सर्जन या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. रोगाचे निदान, उपचार आणि पुनर्वसन या तिन्ही टप्प्यात दंत शल्यचिकित्सक महत्त्वाचे योगदान देऊन रुग्णाचे प्राण वाचवू शकतात, असे मत डॉ. जे. बी. गार्डे यांनी व्यक्त केले आहे.
वेळेवर निदान आवश्यक -
वेळेवर निदान, शास्त्रशुद्ध उपचार, पुनर्वसन या तिन्ही टप्प्यात डॉक्टरांचे योगदान महत्त्वाचे आहे. कोविड बरा झालेल्या काही रुग्णांमध्ये दात हलणे, दुखणे, पू येणे, फोड येणे, वास येणे, नाकातून पू येणे, दृष्टी कमी होणे, डोळे आणि नाकाच्या इन्फेक्शनच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. प्रसंगी यामुळे काही जणांना आपला वरचा जबडा, डोळादेखील गमवावा लागला आहे. मृत्यूचे प्रमाणही पन्नास टक्के झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर निदान होणे आवश्यक आहे. रुग्णाचे रोजचे ड्रेसिंग महत्त्वाचे आहे.