पुणे -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या इतिहासात प्रथमच केंद्र सरकारमध्ये सहकार मंत्रालयाची निर्मिती केली असून त्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सोपविली आहे. त्यांचा हा निर्णय महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र वाचविण्यासाठी आणि त्यावर अवलंबून असलेल्या सामान्य लोकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी व्यक्त केली.
'अमित शाहांच्या समर्थ नेतृत्वावर जबाबदारी'
पाटील म्हणाले की, मोदी सरकारने मंगळवारी नव्या सहकार मंत्रालयाची निर्मिती करण्याचा निर्णय जाहीर केला तर बुधवारच्या मंत्रिमंडळ फेरबदलात या नव्या मंत्रालयाची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या समर्थ नेतृत्वावर सोपविली आहे. नवे मंत्रालय हे सहकार क्षेत्रासाठी ईज ऑफ डुईंग बिझनेस-व्यवसाय सुलभता निर्माण करण्यास आणि मल्टीस्टेट सहकारी संस्थांसाठी उपयुक्त ठरेल, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. सहकार क्षेत्राला सध्या फार मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावे लागत असून या क्षेत्रालाही व्यवसाय सुलभता मिळण्याची गरज आहे, यावर मोदी सरकारने भर दिला हे महत्त्वाचे आहे.