महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पर्यटनला जाण्याचा विचार करताय, तर ही बातमी अवश्य वाचा.. सरकार काढणार नवा आदेश !

राज्यातील कोरोना निर्बंध शिथील झाल्यानंतर राज्यात व परराज्यात पर्यटनस्थळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांची गर्दी होत आहे. जिल्ह्याबाहेर फिरायला जाणाऱ्यांनाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इशारा दिला आहे. फिरण्यासाठी जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांना जिल्ह्यात परतल्यानंतर 15 दिवस क्वॉरन्टीन करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे, असे अजित पवार म्हणाले.

By

Published : Jun 19, 2021, 5:11 PM IST

pawar
pawar

पुणे -राज्यात लॉकडाऊन शिथील केल्यामुळे वीकेंडला नागरिक पर्यटनस्थळावर गर्दी करत आहेत. राज्याबाहेर प्रवास करत आहेत. ट्रेकिंगला जात आहेत हे बरोबर नाही. तिसऱ्या लाटेचा धोका आहे, याचा नागरिकांनी विचार करावा, नाहीतर बाहेर जाऊन आलेल्या लोकांना 15 दिवस विलगीकरणात रहावे लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. ते पुण्यात बोलत होते. पुणे जिल्ह्यात कोरोना आढावा बैठकीनंतर अजित पवार पत्रकारांशी बोलत होते.

वर्षा पर्यटन व हिलस्टेशनवर नागरिकांची गर्दी -

राज्यात जवळपास तीन महिन्यापासून निर्बंध लागू आहेत. त्यात उकाड्याने हैरान नागरिक वर्षापर्यटनाला पसंती देत आहेत. कडक उन्हाळ्यानंतर मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसाच्या रिमझिममुळे सर्वत्र निसर्गाची विविध रुपे पाहायला मिळत आहेत. सूर्याचा दाह झेलून रखरखीत झालेले डोंगरमाथे पुन्हा हिरवाईने बहरले असून अतिवृष्टीमुळे कोकणातील व राज्यातील अन्य ठिकाणची धरणे, धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. अनेक पर्यटनस्थळे नागरिकांना खुणावू लागले आहेत. महाराष्ट्रात कोरोना नियमांच्या धर्तीवर लागू करण्यात आलेले निर्बंध प्रशासनाने टप्प्या-टप्प्याने शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिक जणू याच संधीची वाट पाहत होते असेच काहीसे चित्र पर्यटनस्थळावरील गर्दीने दिसू लागले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार
नाहीतर व्हावे लागेल क्वारंटाईन -

अनेक जण राज्याच्या बाहेर फिरायला जात आहेत. अशा लोकांना जिल्ह्यात परत आल्यानंतर पंधरा दिवस कॉरन्टीन करावे लागेल. असा आदेश काढण्याचा सरकारचा विचार आहे. अशी माहिती अजित पवार यांनी दिली. अजित पवार म्हणाले, की नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा. पर्यटनस्थळी जाऊ नये. पुणे शहर हे लेव्हल 2 मध्ये आहे तर
पिंपरी चिंचवड हे लेव्हल 3 आणि पुणे ग्रामीण लेव्हल 4 मध्ये आहे. त्यानुसार लॉकडाउनचे नियम त्या-त्या ठिकाणी आहेत, असे पवार म्हणाले.

पुण्यात वीकेंड लाॉकडाऊन सुरूच राहणार -

पुण्यातील दुकाने शनिवार आणि रविवार बंदच राहतील. अत्यावश्यक सेवेंतर्गत येणारी दुकाने सुरू राहतील असे देखील अजित पवार यांनी स्पष्ट केले. दुसऱ्या लाटेत पिंपरी चिंचवडमध्ये 53 टक्के मृत्यू 60 वर्षे वयाच्या खालचे आहेत. याचा तरुणांनी गांभीर्याने विचार करावा आणि काळजी घ्यावी, असे सांगत पुणे शहरातील अशी आकडेवारी काढण्यास प्रशासनाला सांगितले असल्याचे ते म्हणाले. परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोव्हॅक्सिन घेतल्यानंतर कोविशिल्डचा डोस घेऊ नये. मुलांच्या पालकांनीही हे लक्षात ठेवावे, असे पवार यांनी सांगितले. कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोक्याची ठरू शकते, असे तज्ञांना वाटत आहे. मात्र पालकांनी घाबरु नये. आपल्याला त्याला संपूर्ण तयारीनिशी सामोरे जायचे आहे. तशी तयारी केली जात आहे, असे त्यांनी सांगितले.

नियमांप्रमाणे कार्यक्रमांना परवानग्या मिळतील -

काँग्रेसचे नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार हे पुढच्या आठवड्यात लोणावळा येथे ओबीसी बैठक घेत आहेत आणि याला 300 जण उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला परवानगी देणार का, असे विचारले असता पुणे ग्रामीण हा भाग लेव्हल 4 मध्ये येतो. तिथल्या नियमाप्रमाणे दिलेल्या परवानगीपेक्षा जास्त लोकांना एकत्रित येता येणार नाही, विजय वडेट्टीवार यांनी लोणावळ्यात 300 जणांची ओबीसी बैठक बोलवली असेल तर मी त्यांच्याशी बोलेन, असे अजित पवार म्हणाले.

आषाढी वारी -

पालखी सोहळ्यातील संख्येची मर्यादा वाढवून देण्याची मागणी संस्थानांच्या प्रतिनिधींनी केली आहे. सध्या त्यावर विचारविनिमय सुरू आहे. काहीतरी तोडगा निघेल, असे अजित पवार म्हणाले.

राजगड रोप वे -

सुरुवातीला कोणताही बदल करत असताना त्याला विरोध व्हायचा, सिद्धिविनायकाच्या जीर्णोद्धारालाही विरोध झाला होता. रायगड रोप वे ला विरोध झाला होता. त्यामुळे आता राजगड रोप वे ला विरोध असणाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ. परंतु वयोवृद्ध, अपंग लोकांसाठी रोप वे आवश्यक आहे असे अजित पवार म्हणाले.

शिवसेनेला शुभेच्छा -

शिवसेनेला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा, ज्यावेळी निवडणुका जाहीर होतील तेव्हा स्वबळावर लढायचे की कोणासोबत जायचे ते सांगेन असे पवार म्हणाले.

कर्ज दिले नाही तर कारवाई -

पुणे जिल्ह्यात पीक कर्जाचे नीट वाटप सुरू आहे. काही ठिकणी तक्रारी येताहेत ज्या बँका पात्र शेतकऱ्यांना कर्ज देणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे पवार म्हणाले.

सर्वांशी चर्चा करतो -

बीड मध्ये काही लोक ताफ्याच्या मध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होते. तिथे नेमके काय झाले मला माहीत नाही. परंतु मी कुणालाच भेट नाकारत नाही. सगळ्यांना वेळ देतो असे असताना कुठेतरी एखादी गोष्ट घडते आणि त्याची ब्रेकिंग न्यूज होते असे ते म्हणाले.

राज्यातील 'या' पर्यटनस्थळावर नागरिकांची गर्दी -

पावसाळ्यात पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेला लोणावळ्यातील भुशी डॅम ओवरफ्लो झाला आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होताच धरण परिसरात पर्यटकांची गर्दी असते. मात्र यावर्षी सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस प्रशासनाकडून धरणारकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे.

त्याचबरोबर नवी मुंबईतील पारसिक हिल भागात अनेक जवळपासच्या पर्यटकांनी गर्दी केली आहे. मुंबईकरांची पाऊलेही लोणावळ्याच्या दिशेनं आणि पुण्यानजीक असणाऱ्या डोंगरमाथ्यांच्या दिशेनं वळली आहेत. येथील लायन्स पॉईंट, टायगर पॉईंटवर अनेक पर्यटकांनी गर्दी केल्याचे दिसून येत आहे.

कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटक आंबोली, सावंतवाडी व गोकाकचा धबधबा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पर्यटक राधानगरी धरण, राऊतवाडी धबधबा, शाहुवाडीतील बरकी धबधबा, आंबा घाट, करुळ घाट, दंडोबा डोंगर, गिरीलिंग डोंगर, महाबळेश्वर, पाचगणी, कासपठार, कास तळास, ठोसेघर धबधबा येथे गर्दी करत आहेत.

मराठवाड्यातील पर्यटक येडशी धबधबा, सौताडा, भंडारदरा, चिखलदरा येथे जात आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details