पुणे - ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ओबीसी आरक्षण हे केंद्र सरकारमुळे गेले आहे असे म्हटले होते. यावर पुणे विमानतळावर आज (मंगळवार) विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते यावेळी म्हणाले की, संपूर्ण देशात ओबीसी आरक्षण सुरू आहे. फक्त महाराष्ट्रात ओबीसींच्या राजकीय आरक्षण गेलेलं आहे. इतर कुठल्याही राज्यात ते गेलेलं नाही. हा राज्य सरकारचा नाकर्तेपणा आहे. राज्य सरकारला ओबीसींना आरक्षण द्यायचे नाही. जोपर्यंत महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत नाहीत तोपर्यंत राज्य सरकारला ओबीसींच्या आरक्षणामध्ये चालढकल करायची आहे, तोपर्यंत कारणं सांगायची आहेत, अशी टीका फडणवीस यांनी राज्य सरकारवर केली आहे.
सरकारकडून ओबीसींना फसवण्याचे काम सुरू -
ओबीसी आयोगाने स्वतः राज्य सरकारला पत्र पाठवून एम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी पैशाची मागणी केलेली आहे. त्यामुळे सरकारच्या मनात असेल तर ओबीसीला आरक्षण मिळू शकेल. परंतु, ओबीसींना आरक्षण मिळावे असे सरकारच्या मनात नाही हे स्पष्टपणे दिसून येत आहे. ओबीसींना फसवण्याचे काम या सरकारकडून सुरू आहे, असा आरोपही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.