मावळ (पुणे) : मान्सून यावर्षी वेळेत दाखल झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका परिसरात मोठ्या प्रमाणावर भात लागवड केली जाते. त्यामुळे पाऊस झाल्यानंतर भात पेरणीची लगबग सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. परिसरातील शेतकरी सगुणा राईस तंत्राद्वारे भात लागवड करण्याला पसंती देत आहेत. मावळ तालुक्यातील शिळींब, आजिवली, तुंग, चावसर, मोरवे, कडधे, जवण, पुसाने, मळवंडी ढोरे, वारू, करूंज, ब्राह्मणोली, शिरगाव, दारुंब्रे, चांदखेड, दिवड, आढले, शिवली, उर्से, परिसरात शेतकऱ्यांनी भात पेरणी सुरू केली आहे.
मावळ तालुक्यात पावसाचे वेळेवर आगमन झाल्याने शेतकऱ्यांकडून भात पेरणाीला सुरुवात... हेही वाचा...लग्नसमारंभात वापरण्यासाठी खास 'पैठणी मास्क', नवरीचाही मेकअप राहणार व्यवस्थित
कोरोना संकटामुळे यावर्षी बाहेरील राज्यातील मजूर मूळ गावी निघून गेल्याने मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. स्थानिक मजूर मिळणे देखील कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकरी सगुणा तंत्राद्वारे भात लागवड होताना दिसत आहे. स्थानिक मजूर मिळण्याचे प्रमाण मावळ तालुक्यात खूप कमी आहे. यावर्षी पाऊस वेळेत पडल्यामुळे सर्व शेतकऱ्यांची भात लागवड एकाच वेळी होणार असल्याने मजूरांचा तुटवडा जाणवनार आहे. त्यामुळे शेतकरी सगुणा भात लागवडीकडे वळाला आहे.
सगुणा लागवड पद्धत म्हणजेच एस.आर.टी लागवड होय. या पद्धतीने भात लागवड केल्यास कमी कष्टामध्ये अधिक उत्पन्न मिळते. त्यात कोळपणी करण्याची गरज उरत नाही .रासायनिक खतांच्या आवश्यकतेचे प्रमाण निम्म्यावर येते. या नाविन्यपूर्ण पद्धतीमूळे भाताच्या उत्पादनात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.