पुणे -शहरात दोन दिवस पडलेल्या पावसामुळे आता पावसाळी वस्तूच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. जून महिन्याच्या शेवटपर्यंत पाऊस न पडल्यामुळे नागरिक पावसाळी खरेदीकडे वळत नव्हते. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहरामध्ये सलग पाऊस पडत असल्याने नागरिकांची आता रेनकोट आणि छत्री खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. दोन वर्षे कोरोनाचा फटका पावसाळी वस्तू विकणाऱ्या व्यापाऱ्यांना सुद्धा बसला. परंतु, दोन वर्षांनंतर आता शाळा, तसेच सर्व व्यवहार सुरळीत झाल्यामुळे नागरिकांचा सुद्धा आता पावसाळी वस्तू खरेदीकडे कल वाढला आहे.
हेही वाचा -Chevening Scholarship : दीक्षा दिंडे ठरली ब्रिटिश सरकारच्या प्रतिष्ठित स्कॉलरशिपची मानकरी
रेनकोट, छत्रीचे भाव 10 ते 15 टक्क्यांनी वाढले - पुण्यातील बाजारांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. सध्या बाजारामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रेनकोट आलेले आहेत. यावर्षी रेनकोट आणि छत्रीचे भावसुद्धा दहा ते पंधरा टक्के वाढल्याचे व्यापारी सांगतात. त्याचा फटका व्यापाऱ्यांच्या व्यवसाय विक्रीवर पडलेला आहे. परंतु, पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे ही विक्री मोठ्या प्रमाणात सुरू होईल आणि ग्राहक खरेदीसाठी गर्दी करतील, अशी व्यापाऱ्यांना आशा आहे.
राज्यात 5 जुलैपासून चांगला पाऊस अपेक्षित -मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाले असून, त्याच्या कवेत राज्यातील अनेक जिल्हे आली आहेत. जून महिन्यात अनेक जिल्ह्यात बरसल्यानंतर पावसाने दांडी मारल्याचेही दिसून आले. दरम्यान, ओरिसा व लगतच्या भागात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र व त्याची संभाव्य वायव्य दिशेकडे होणारी वाटचाल यामुळे अरबी समुद्र व बंगालचा उपसागर या मान्सूनच्या दोन्ही शाखा सक्रिय होऊन 2 दिवसांत राज्यात 5 जुलैपासून पुढील 4-5 दिवस चांगला पाऊस अपेक्षित आहे, असा अंदाज काल हवामान खात्याने व्यक्त केला. 5 ते 7 जुलै 2022 दरम्यान मध्य भारत आणि पश्चिम किनारपट्टीवर पुढील 5 दिवसांमध्ये आणि वायव्य भारतात सक्रिय मान्सूनची स्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने वर्तवला आहे. आज राज्यातील प्रमुख शहरांचे तापमान किती? याबाबत जाणून घ्या.
हेही वाचा -Anand Dave Hindu Mahasangh : हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांना केंद्रीय यंत्रणेचा इशारा, सावध राहण्याचा दिला सल्ला