पुणे -ससून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना फोन करून, डॉक्टर बोलत असल्याचे सांगून इंजेक्शनच्या नावाखाली त्यांच्याकडून ऑनलाईन पैसे घेऊन फसवणूक करणाऱ्या एकाला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. अमित जगन्नाथ कांबळे (वय 34) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, त्याने आतापर्यंत अशा प्रकारचे 21 गुन्हे केले आहेत. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, ससून रुग्णालयात एका लहान मुलावर उपचार सुरू होते. आरोपीने त्याच्या कुटुंबीयांना फोन करून तुमच्या मुलाला तत्काळ इंजेक्शन द्यावे लागेल. एका इंजेक्शनची किंमत सात हजार रुपये असून, असे तीन इंजेक्शन द्यावे लागतील असे सांगितले. त्यांच्याकडून ऑनलाईन वीस हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास करत आरोपीला अटक केली.