पणजी -राज्यात निवडणुकीचे वातावरण तापले आहे. विविध मुद्यांवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत टीकेचे धनी होत आहेत. मात्र, काल रात्री राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात गोव्याविषयी मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. हा गौप्यस्फोट केला आहे, राज्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी. एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मलिक म्हणाले की, कोविड काळात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला आहे. आपण याला विरोधही केला, मात्र आपल्या विरोधाला न जुमानता राज्यपाल पदावरून आपल्याला हटविण्यात आले, असेही ते म्हणाले.
'मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी' -
दरम्यान, सत्यपाल मलिक यांनी हा गौप्यस्फोट एका राष्ट्रीय वाहिनीवरील मुलाखतीत केल्यामुळे राज्याच्या व राष्ट्रीय राजकारणात मुख्यमंत्र्यांवर विरोधकांनी प्रचंड टीका केली विरोधी पक्ष कॉंग्रेससह तृणमुलने मुख्यमंत्र्यांच्या या कृत्याचा निषेध करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तृणमूलच्या प्रवक्त्या प्रतिभा बोरकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत निषेध व्यक्त केला.