गोवा -गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी (Goa Assembly Election Campaign) अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सत्ताधारी भाजप, काँग्रेस- गोवा फॉरवर्ड, आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस- मगोप, राष्ट्रवादी-शिवसेना, रिव्हॉल्युशनरी गोवनसह अनेकांची प्रचारासाठी लगबग वाढली आहे. शहरी भागासह ग्रामीण भागात प्रचाराचा वेग वाढला (Election Campaign in Goa) आहे. प्रचारावरील निर्बंधात सवलत मिळाल्याने लवकरच राष्ट्रीय पातळीवरचे नेते गोव्यात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जाणार आहेत.
- 150 हून अधिक स्टार प्रचारक येणार गोव्यात-
प्रचारासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, स्मृती इराणी, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, अरविंद केजरीवाल, शरद पवार, ममता बॅनर्जी, आदित्य ठाकरे यांच्यासह 150 हून अधिक बडे नेते प्रचारात दाखल होणार आहेत.
भाजपने केंद्रीय नेतृत्वाखाली गोव्यातील प्रचाराची यंत्रणा काटेकोरपणे आखली आहे. यासाठी भाजपच्या नेत्यांचा मोठा फौजफाटा गोव्यात दाखल झाला आहे. सध्याच्या घडीला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमाई, देवेंद्र फडणवीस, सी टी रवी, केंद्रीय मंत्री किशन रेड्डी, दर्शना जरदोष यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात भाजपचा प्रचार केला जात आहे.
2017 साली हातातून सत्ता गेल्याचे दुःख काँग्रेसच्या जिव्हारी लागले आहे. ही चूक पुन्हा होऊ नये यासाठी काँग्रेसने आधीच सावध पवित्रा घेतला आहे. काँग्रेस सध्या 37 जागा लढवत असून, 3 जागा गोवा फॉरवर्डला सोडण्यात आल्या आहेत, विधानसभा प्रचाराची धुरा पी. चिदंबरम, दिनेश गुंडू राव आणि अलका लांबा यांच्यावर सोपवण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक काँग्रेसचे बडे नेतेही सध्या प्रचारात सहभागी होत आहेत.
- राष्ट्रवादी- सेनेची तयारी सुरू-
राष्ट्रवादी आणि शिवसेनेला काँग्रेस पक्षाने हात दाखवल्यानंतर दोघांनीही प्रत्येकी 12 उमेदवार उभे केले आहेत. प्रचारासाठी शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार, धनंजय मुंडे हे मंत्री तर, शिवसेनेच्यावतीने आदित्य ठाकरे, उदय सामंत, उर्मिला मातोंडकर, आदेश बांदेकर आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येणार आहेत.