नाशिक -नाशिक रोड येथील एका मंगल कार्यालयातील एका अनोख्या विवाह सोहळ्याची चर्चा सध्या महाराष्ट्रभर गाजत आहे. नवीन उद्योजक असणाऱ्या एका नववधूने आपल्या स्वतःच्या विवाह सोहळ्यामध्ये महिलांना भेटवस्तू म्हणून सॅनेटरी नॅपकिन वाटप ( Sanitary Pads Gift by Bride in Marriage ) केले आहे. महिलांनी मासिक पाळी विषयी जनजागृती करावी आणि स्वच्छतेविषयी समाजात महिलांनी मोकळेपणाने संवाद साधावा हा या उपक्रमा मागचा नववधूचा हेतू होता.
उपक्रमाने विवाहाची चर्चा सोशल मीडियावर -
महिलांच्या मासिक पाळी विषयी समाजात खुलेपणाने आजही चर्चा होत नाही. मात्र स्वच्छतेचा महिलांमध्ये जागर व्हावा आणि आपल्या विवाहामध्ये शासनाच्या स्वच्छता कार्यक्रमाला हातभार लागावा, या उद्देशाने नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील जातेगाव येथील नववधू असणारी स्वाती दिघोळे हिने आपल्या विवाह समारंभात चक्क महिलांना भेटवस्तू म्हणून सॅनेटरी नॅपकिन वाटले आहेत. महिलांनी मासिक पाळी विषयी जनजागृती करत स्वच्छतेविषयी समाजात मोकळेपणाने संवाद साधावा हा या उपक्रमा मागचा हेतू होता. या उपक्रमाला विवाहबद्ध झालेल्या पती अक्षय पानसरे यांनी मोलाची साथ दिली आहे. या अनोख्या उपक्रमामुळे या विवाहाची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर होत आहे. लग्नाला उपस्थित असणाऱ्या वराडी मंडळींसह पाहुणे मंडळी, मित्रपरिवार यांनीही या अनोख्या भेटवस्तूचा सन्मानाने स्वीकार करत स्वाती यांना पाठबळ दिले.