नाशिक -नाशिक कारागृहात कैद्यांनी यंदाही शाडूमातीच्या गणेश मूर्ती तयार केल्या आहेत. नुकतेच या गणेश मूर्तीची विक्री व प्रदर्शनाचे उद्घाटन नाशिक पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या हस्ते नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहाच्या आवारात पार पडले. कारागृहातील कैद्यांनी यंदा 540 शाडूमातीच्या गणेश मूर्ती केल्या. नागरिकांचा प्रतिसादही याला चांगला मिळत असून बहुतांश गणेश मूर्तींची आगाऊ नोंदणी झाली आहे.
एखाद्या चुकीमुळे हे कैदी शिक्षा भोगत असले तरीही त्यांच्यात चांगले कलागुण आहेत. आणि त्यांच्या याच कलागुणांना वाव देण्यासाठी कारागृह प्रशासन गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे. कैद्यांनी बनविलेल्या वस्तूंच्या विक्रीतून लाखो रुपयांचा महसूल देखील प्राप्त झाला आहे. या वेळेस पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्यासह सह कारागृह अधीक्षक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
11 इंचापासून 22 इंचापर्यंतच्या मूर्त्या
कैद्यांमुळेच कारागृहात मूर्ती बनविण्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. सर्वात पहिले फ्रेंच कैद्याने कारागृहात मूर्ती तयार केली. त्यानंतर महाराष्ट्रातल्या कारागृह विभागात मूर्ती कलेची वाढ झाली असे प्रतिपादन कारागृहाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी सांगितले. दरवर्षीप्रमाणे कैद्यांनी बनवलेल्या मूर्त्यांनी कारागृहाची बाजारपेठ सजली आहे. या मूर्ती पाहण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. यातून मोठा महसूल मिळणार असल्याचे तुरुंगाधिकारी व कारखाना व्यवस्थापक शामराव गीते यांनी स्पष्ट केले.