नाशिक -राज्यातील सर्व जिल्हे तिसऱ्या स्तरात आणल्याने राज्य सरकारकडून निर्बंध थोडे शिथील केले आहेत. त्यामुळे नागरिकांची पाऊले वर्षा पर्यटनासाठी धबधबे व धरणांकडे वळू लागली आहेत. अनेक ठिकाणी प्रशासनाच्या सुचनेकडे दुर्लक्ष करून अतिउत्साही पर्यटक जीव धोक्यात घालून पाण्यात उतरत असतात. यामुळे अनेक ठिकाणी अपघात झाले आहेत. नाशिकमधील वालदेवी धरण, भावली धरण, गंगापूर धरण परिसरात विकेंड असल्याने पर्यटक गर्दी करत आहेत. त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी पर्यटनस्थळांवर जाणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करण्यासाठी विषेश पथके नेमली आहेत. कोरोनामुळे पर्यटनस्थळांवर निर्बंध असतानाही मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटनस्थळांवर येत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. अतिउत्साही पर्यटकांना पोलिसांकडून पोलिसी खाक्या दाखवला जात आहे. तर कुटुंबासोबत येणाऱ्यांना पोलिसांची विनंती करुन आल्या पावले परत पाठवत आहेत.
शंभरपेक्षा अधिक पर्यटकांवर कारवाई -
जिल्ह्यातील धरण परिसरामध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांवर आता पोलिसांनी थेट कारवाईला सुरुवात केली असून आतापर्यंत शंभरपेक्षा अधिक लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती ग्रामीण पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षक एन.एन. पाटील यांनी दिली आहे.
कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे पर्यटन स्थळांवर निर्बंध आणण्यात आले आहे. तरी देखील मोठ्या प्रमाणावर नाशिक आणि नाशिकच्या बाहेर नागरिक हे पर्यटनासाठी धरण तसेच विविध गडांवर येत आहेत. त्यांना वारंवार विनंती करून आणि आवाहन करूनही या पर्यटकांची संख्या शनिवार आणि रविवार या दिवशी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे आता पोलिसांनी थेट कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पोलीस उपनिरीक्षक एन. एन. पाटील यांनी सांगितले की, आतापर्यंत 100 पेक्षा अधिक पर्यटकांवर गुन्हे दाखल करून दंड वसूल करण्याची प्रक्रिया देखील करण्यात आली आहे. जे अतिउत्साही पर्यटक येत आहेत. त्यांना पोलिसाकडून पोलिसी खाक्या दाखवण्यात येत आहे. तर जे आपल्या कुटुंबासमवेत आहे त्यांना पोलीस विनंती करून परत पाठवत आहेत. जिल्ह्यातील वालदेवी, भावली, गंगापूर , वैतरणा यासह अन्य ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी सहकार्य करावे आणि कोरोना महामारीच्या प्रादुर्भावापासून आपल्याला आणि आपल्या परिवाराला वाचवावे असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक एन. एन. पाटील यांनी केले आहे.
राज्यातील 'या' पर्यटनस्थळावर नागरिकांची गर्दी -