नाशिक - कोरोना मुळे दोन वर्षे खंडित झालेली रहाडी परंपरा यंदा पुन्हा सुरू होत ( Nashik Rahadi Rangpanchami 2022 ) आहे. त्यामुळे नाशिकच्या रंगप्रेमी मध्ये उत्साह संचारला आहे. 300 वर्षांची पेशवेकालीन परंपरा असलेली रहाड संस्कृतीला आज ही विशेष महत्व ( Historical 300 Year Tradition Rahad Rang Panchami ) आहे.
महाराष्ट्रात सर्वत्र होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवडीला रंग खेळला जातो. पण, नाशिक याला अपवाद आहे. नाशिक मध्ये रंगपंचमीला रंग खेळण्याची परंपरा आहे. अन्य शहरापेक्षा नाशिकला रंगपंचमी वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. याला पेशवेकालीन परंपरा आहे. रंगोत्सवासाठी इतिहासकालीन रहाडी खुल्या करण्यात येतात. नाशिककरही त्याचा मनमुराद आनंद लुटतात.
पेशवेकालीन परंपरा
पेशवेकाळापासून रंग खेळण्यासाठी जुने नाशिक व भागांत रहाडींची निर्मिती करण्यात आली होती. होळीच्या दुसऱ्या दिवसापासून रहाडीचे खोदकाम काम सुरू होते. रंगपंचमीच्या आदल्या दिवसांपर्यंत स्वच्छता करून त्यात स्वच्छ पाणी भरून ठेवले जाते. रंगपंचमीच्या दिवशी त्यात रंग तयार करून टाकले जातात. त्यानंतर विधिवत पूजा करून नागरिकांना रंग खेळण्यासाठी रहाडी खुल्या करण्यात येतात. या पेशवेकालीन रहाडीत पाणी आणि रंग मिसळून जलदेवतेची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा होते. या रहाड संस्कृतीला मोठा इतिहास आहे.