नाशिक : गुरुवारपासून शहरातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता जिल्ह्यातील दुकाने व व्यावसायीक आस्थापनांना वेळेचे बंधन किंवा मर्यादा असणार नाही. यासोबतच सम-विषम हा नियम किराणा दुकाने, मेडिकल्स व वैद्यकीय सेवांना लागू नसणार आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील आणि महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या बैठकीत बुधवारी हे निर्णय घेण्यता आले आहेत.
शहरातील वाढत्या करोना संसर्गास पायबंद घालण्याच्या दृष्टीने बुधवारी शहरातील तीन प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक झाली. कोरोना संसर्गाशी लढताना नाशिककरांनी आजपर्यंत प्रशासनाला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच जिल्ह्यातील व शहरी क्षेत्रातील कोरोनाचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी यापुढेही नागरिकांचे सहकार्य प्रशासनाला लागणार आहे. परंतु सद्यस्थितीत शहरी भागात होणारी गर्दी कोरोना संसर्गाच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असल्याने याबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक पार पडली.
शहरातील महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी ही प्रामुख्याने दुकानांच्या वेळेवर असलेल्या मर्यादेमुळे आणि दुकाने कमी काळ सुरू राहत असल्याने होत आहे. तसेच, काही जीवनावश्यक वस्तूंची दुकाने एक दिवसाआड बंद राहिल्याने नागरिक या वस्तूंचा संचय करण्यासाठी गर्दी करीत असतात, अशी बाब निदर्शनास आली. याबाबत शासकीय अधिसूचनेतील तरतुदींचा वापर करून दुकानांचा कार्यकाळ वाढल्यास, गर्दी विखुरली जाऊन फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे सुकर होईल असे सर्वमताने ठरवण्यात आले. यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करून संयुक्तपणे जिल्हा प्रशासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतले असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.