नाशिक - महिला पोलिसांनी स्टिंग ऑपरेशन करत रात्रीच्या वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांची छेड काढणाऱ्या पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. रात्रीच्या वेळी एकट्याने प्रवास करताना महिलांना सुरक्षित वाटावे, यासाठी शहर पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे.
देशातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढल्याने शहर पोलिसांनी खबरदारीच्या अनुषंगाने संबंधित कारवाई केली आहे. शहर पोलिसांनी महिला सुरक्षिततेसाठी निर्भया पथक सुरू केले आहे. या अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या मोहिमे दरम्यान पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या पथकातील पोलीस महिला साध्या वेशात शहरातील बस-रिक्षा स्टँडवर उभ्या राहतात. अशा एकट्या महिलांकडे काहींनी अश्लील हावभाव तसेच काहींनी छेड काढल्याचे समोर आले आहे. अशा गैरप्रकाराचे व्हिडीओ रेकॉर्डींग करुन संबंधित नराधम पळ काढण्याआधीच त्यांना ताब्यात घेण्यात येते.
याच मोहिमेंतर्गत रात्रीच्या वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांची छेडछाड करणाऱ्या संशयित व्यक्तींचे स्टिंग ऑपरेशन करुन वेगवेगळ्या ठिकाणाहून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या विरोधात सरकारवाडा, अंबड आणि पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.