नाशिक - मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस असलेल्या हरी विहार सोसायटीच्या बंद गाळ्यामध्ये आढळलेले मानवी अवयव हे गाळामालक महिलेच्या डाॅक्टर मुलानेच ठेवल्याचे निष्पन्न झाले आहे. किरण विठ्ठल शिंदे असे या कान, नाक व घसा तज्ज्ञ डाॅक्टरचे नाव आहे. दरम्यान, पाेलिसांनी डाॅ. शिंदे यांचे जाबजबाब नाेंदविणे सुरु केले असून त्यांनी हे अवयव खासगी ठिकाणी कसे बाळगले, याचा तपास सुरु करण्यात आला आहे.
गाळा लावला व 20 ते 22 वर्षांपासून उघडलाच नाही : मुंबई नाका पाेलीस, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय यासंदर्भात महाराष्ट्र शरीरशास्त्र कायद्यानुसार तपास व चौकशी करणार आहे. डाॅ. किरण शिंदे यांनी सन 2000 मध्ये मुंबईतील नानावटी रुग्णालयातून हे अवयव परीक्षण व अभ्यासासाठी नाशिकमध्ये आणले हाेते. तसेच सन 2005 मध्ये या अवयवांच्या कंटेनरमध्ये फाॅर्मेलीन व पाणी तसेच अन्य केमिकल टाकून जतन केले हाेते. तेव्हापासून त्यांनी हा गाळा लावला. 20 ते 22 वर्षांपासून उघडलाच नाही. याबाबत पोलीस आयुक्त दीपक पाण्डे्य यांनी सांगितले की, महाराष्ट्र शरीरशास्त्र कायद्यानुसार अभ्यासाच्या हेतूने मानवी अवशेष उपलब्ध करून देण्याचे अधिकार जिल्हा शल्यचिकित्सकांना आहेत. त्यामुळे या घटनेचा तपास जिल्हा शल्यचिकित्सक करतील. त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील पाेलीस कारवाई केली जाईल. शुभांगीनी शिंदे यांच्या मालकीच्या गाळा नंबर 20 मध्ये रविवारी रात्री प्लास्टिक बादल्यांमध्ये जतन केलेले आठ कान व मष्तिष्क (डाेके) आढळून आले हाेते. माहिती कळताच पाेलीस उपायुक्त पाैर्णिमा चाैगुले, सहायक आयुक्त दीपाली खन्ना, वरिष्ठ पाेलीस निरीक्षक सुनिल राेहाेकले, चंद्रकांत आहिरे व फाॅरेन्सिक एक्सपर्ट दाखल झाले हाेते.