नाशिक -एकनाथ खडसे यांच्यावर ईडीकडून होणारी कारवाई राजकीय आकसापोटी होत असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. भाजपात यावे किंवा भाजपामधून बाहेर जाऊ नये यासाठी ईडीचा वापर केला जात असल्याचे देखील भुजबळ यांनी म्हटले आहे. नाशिक जिल्ह्यातील कोरोनो आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत भुजबळ बोलत होते.
'खडसेंवरील कारवाई राजकीय आकसापोटी'
अनिल देशमुख असो की एकनाथ खडसे यांच्यावर ईडीकडून होत असलेली कारवाई राजकीय आकसापोटी होत असून मी देखील त्यातून गेल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. भाजपामधून बाहेर पडल्यावर कारवाई होते, असे याला म्हणावे लागेल असे देखील भुजबळ यांनी म्हटले आहे.
भुजबळांनी घेतला आढावा
नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत म्यूकरमायकोसिस संख्या 104 वर असून म्यूकरमायकोसिसमध्ये 10 टक्के मृत्यू होत आहेत. यावर उपचार करणारी अँफोथरेसिन इंजेक्शन अद्याप मुबलक प्रमाणात उपलब्ध नाहीत, अशी खंत भुजबळ यांनी व्यक्त केली. नाशिक जिल्ह्यात कोरोनोचा प्रादुर्भाव कमी होत आहे. सद्यस्थितीत पॉझिटिव्हीटी रेट 1.22 टक्के इतका आहे. तिसऱ्या लाटेबाबत जिल्हा पातळीवर नियोजन करण्यात आले आहे. या लाटेत सव्वा लाख बालक बाधित होतील, असा अंदाज पकडून नियोजन करण्यात आले आहे. यासाठी 5 हजार बेडचे नियोजन करण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्यात 12 लाख लोकांचा पहिला डोस पूर्ण झाला असून 3 लाख 18 हजार लोकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहे. केंद्राकडून 4 ऑक्सिजन प्लांट येणार होते, मात्र आता 2 प्लांटच येणार आहे. ऑक्सिजन देखील मुबलक प्रमाणत उपलब्ध आहे. जिल्ह्यातील कंपन्यांचा सीएसआर निधी कोविड कामासाठीच वापरण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी म्हटले आहे.