नागपूर- विधानपरिषद पदवीधर निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. नागपुरातील १६४ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यासाठी मतदार सकाळपासूनच मतदान करण्यासाठी केंद्रावर दाखल होत असल्याचे पहायला मिळत आहे. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर देखील प्रशासनाकडून खबरदारी म्हणून सर्वच व्यवस्था करण्यात आल्याचे दिसून आले.
सर्वांचे लक्ष लागलेल्या विधानपरिषद पदवीधर निवडणूक मतदान प्रक्रियेला आज सकाळपासूनच सुरुवात झाली आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया चालणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत असल्याने संसर्ग होऊ नये म्हणून मतदान केंद्रावर सर्वच खबरदारी प्रशासनाकडून घेण्यात आल्याचे पहायला मिळत आहे. यात मतदानासाठी आलेल्या मतदारांचे थर्मल स्क्रिनिंग केल्या जात आहे. तसेच सॅनिटायझेशनची व्यवस्थाही प्रत्येक केंद्रावर करण्यात आली आहे. नागपुरात १ लाख २ हजार ८०९ मतदार आहेत. त्यामुळे नागपूरच्या मतदानाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मतदान प्रक्रियेला सुरूवात होताच मतदारांकडून मतदान करण्यासाठी केंद्रावर दाखल होत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे एकंदरीतच ही पदवीधर निवडणूक सर्वच अंगाने महत्वपूर्ण आहे. म्हणूनच प्रशासन व विविध राजकीय पक्षांच्यावतीने मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.