नागपूर -नागपूरसह सर्वत्र महाराष्ट्र दिन ( Maharashtra Day ) उत्साहात साजरा होत असताना उपराजधानी नागपुरात महाराष्ट्र दिनाच्या समर्थनार्थ आणि विरोधात, असे दोन वेगवेगळे रंग पाहायला मिळाले. एका बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ( MNS Celebrated Maharashtra Day ) कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस हातात भगवे झेंडे घेऊन व आतिषबाजी करत साजरा केला. तेच दुसऱ्या बाजूला विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या ( Separate Vidarbha State Demand ) कार्यकर्त्यांनी वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी अनेक प्रशासकीय कार्यालयांवर विदर्भ शासन, असे स्टिकर लावून आणि व्हेरायटी चौकात हातात काळे झेंडे घेऊन आणि काळे कपडे परिधान करून काळा दिवस म्हणून साजरा केला जातो आहे.
विदर्भावाद्यांकडून काळा दिवस - नागपुरात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने महाराष्ट्र शासन पुसून विदर्भ शासन, असे स्टिकर शासकीय कार्यालयांच्या फलकांवर लावण्यात आले. तसेच दुपारी व्हेरायटी चौकात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने महाराष्ट्र दिन हा विदर्भासाठी काळा दिवस असल्याचे म्हणत हातात काळे झेंडे आणि काळया पट्ट्या बांधून निषेध नोंदवला आहे. यावेळी काही आंदोलक महिलांनी काळया रंगाचा पोशाख घालून निषेध केला. यावेळी वेगळा विदर्भाला विरोध करणाऱ्याच्या विरोधात घोषणा देण्यात आल्यात. तसेच भाजपने वेगळा विदर्भ देऊ, या अश्वासनाचे आठवण करून देत याचे उत्तर 2024 मध्ये द्यावे लागेल, असा इशाराही दिला. विदर्भासाठी झालेल्या नागपूर कराराचे अटीचे पालन होत नसल्याचे म्हणता त्याचा विरोधही करण्यात आला.