नागपूर - लॉकडाउनच्या काळात हजारोंनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. त्यामुळे आर्थिक चणचण सहन करावी लागत आहेत. स्वतः जवळ कौशल्ये असताना देखील काम मिळत नसल्याने नागपूर येथे दोन तरुणी देह विक्रीच्या व्यवसायात उतरल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. नागपूर-कोराडी मार्गावर विजयानंद सोसायटी या चांगल्या कॉलोनीमध्ये एका अर्धवट निर्माण झालेल्या घरात पोलिसांनी छापा मारला, तेव्हा ही धक्कादायक माहिती समोर अली आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी चंद्रशेखर मुदलियार नावाचा दलाल कोराडी मार्गावरील विजयानंद कॉलोनीमध्ये एका अर्धवट निर्माण झालेल्या स्वतःच्या घरात काही तरुणींकडून देह व्यापार करून घेत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी काही नकली ग्राहकांना दलालासोबत संपर्क साधायला लावले. त्यांच्यात सौदा पटल्यानंतर पोलिसांनी त्या ग्राहकांना विजयानंद सोसायटीच्या त्या घरात पाठविले. संध्याकाळी अंधार झाल्यानंतर पोलिसांनी पाठवलेल्या नकली ग्राहकांकडून संकेत मिळताच पोलीस पथकाने त्या ठिकाणी छापा घातला. तेव्हा त्या घरात चंद्रशेखर मुदलियार दोन तरुणींकडून बळजबरीने देह व्यापार करून घेत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी लगेच दलाल चंद्रशेखर मुदलियार याला अटक केली आणि दोन्ही तरुणींना ताब्यात घेत पोलीस स्टेशनला आणून विचारपूस केली.
नागपूर गुन्हे शाखेकडून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश... हेही वाचा...पुणे विमानतळ परिसरातून बनावट चलन जप्त, नोटांची किंमत 87 कोटी
तेव्हा दोन्ही तरुणींनी लॉकडाऊन लागण्याच्या पूर्वी दोघी वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करत होत्या. एक तरुणी गुजरात मधील राजकोट या ठिकाणी साडीच्या कारखान्यात डिझायनिंगचे काम करायची, तर दुसरी तरुणी नागपुरात एका खाजगी रुग्णालयात काम करायची. मात्र, मार्च महिन्यात लॉकडाऊन लागल्यानंतर राजकोटमधील रोजगार गेल्यामुळे पहिली तरुणी नागपूरला परत आली. तर लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या कालावधीत खाजगी रुग्णालयातील ओपीडी बंद असल्याने रुग्णालयात अटेंडेंट म्हणून काम करणारी दुसरी तरुणी ही बेरोजगार झाली. बेरोजगारीमुळे दोघींपुढे त्यांच्या कुटुंबासाठी अर्थार्जनाचा प्रश्न उभा राहिला. १७ मे ला लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर दोघीनी पुन्हा नोकरीचा शोध सुरु केला, मात्र त्यांना यश मिळाले नाही.
नोकरीच्या शोधातच असताना एका महिलेच्या माध्यमातून दोघी चंद्रशेखर मुदलियारपर्यंत पोहोचल्या. मात्र, गुन्हेगारी जगताशी संबंध असलेल्याला मुदलियार याने दोघींना कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याचे आमिष दाखवत देह विक्रीच्या व्यवसायात ओढले. गेले काही दिवस चंद्रशेखर मुदलियार दोघींकडून विजयानंद सोसायटीतील घरातून देह विक्रीचे व्यवसाय करून घेत होता. ग्राहकांकडून मोठी रक्कम वसूल करून ही तो या दोन्ही तरुणींना फार अल्प मोबदला देत होता. काल (बुधवार) पोलिसांचा छापा त्या ठिकाणी पडल्यानंतर हे सर्व प्रकार समोर आला आहे.