नागपूर -अनलॉकच्या प्रक्रियेत हळूहळू सर्व सुरळीत होत असताना देखील राज्य सरकारने सांस्कृतिक कार्यक्रमांवरील बंदी कायम ठेवली आहे. त्यामुळे हजारो कलावंतांना गेल्या दीड वर्षांपासून बेरोजगारीची मार सहन करावी लागत आहे. उदरनिर्वाहाचे क्षेत्रच बंद असल्याने कलावंत आणि इतर कला क्षेत्राशी संबंधित इतरांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर झालेला आहे. त्यामुळे आता तरी सरकारने नाट्यगृह आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करायला परवानगी द्यावी, या मागणीसाठी आज (सोमवार) संविधान चौकात रंगकर्मीकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडोच्या संख्येने रंगकर्मी या आंदोलनात सहभगी झाले होते.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षांपासून राज्यातील सांस्कृतिक चळवळ बंद पडलेली आहे. मग कलावंतांनी करायचे काय आणि जगायचे कसे? हा प्रश्न रंगकर्मींनी सरकारला विचारला आहे. कला सादर न करता मन मारायचं कसं आणि हे कुठवर चालणार, असा देखील प्रश्न रंगकर्मीकडून विचारण्यात आला आहे. लोकाश्रयाचा आधार असलेल्या आम्हा कलाकारांना राजाश्रय नाही, सरकार लक्ष देत नाही. त्यामुळे उपासमारीची वेळ कलावंतांवर व त्यांच्या कुटुंबीयांवर आली आहे. उद्या खायचं काय हा प्रश्न सतत भेडसावत असतो. कलाकार त्यांची कला सादर करू शकत नाही. कारण संस्कृती क्षेत्रावरच बंदी लावण्यात आलेली आहे. अशा परिस्थितीत शासनाच्या वतीने कलावंतांना कोणत्याही स्वरूपाची मदत मिळालेली नाही. आर्थिक विवंचनेतून कुटुंबाची अशी दुरावस्था पाहून अनेक कर्तेधर्ते कलाकार असलेल्या कुटुंबाचा आधार आत्महत्येस प्रवृत्त होत आहे, तर अनेकांनी टोकाचे पाऊल आधीच उचलले आहे. तरीही मायबाप सरकार कलाकारांच्या परिस्थितीला का समजून घेत नाही, असा सवाल या रंगकर्मींनी विचारला आहे.
'अभी नही तो कभी नही'