नागपूर -अमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यासह आर्यन खान प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल याने गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहे. ज्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आरोप-प्रत्यारोपानंतर नार्कोटिक ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावण्यात आलेले आहे. या संपूर्ण घटनाक्रमावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की एखाद्या गंभीर गुन्ह्यांचा तपास करताना केसशी संबंधित कुणीही अधिकाऱ्यावर आरोप केले असतील तर ते आरोप तपासण्याचे काम तपास यंत्रणांकडून केले जाऊ शकते. त्यातूनच आरोपांमध्ये सत्यता आहे की नाही हे स्पष्ट होईल, असे देखील ते म्हणाले आहेत. समीर वानखेडे यांची चौकशी सुरू आहे अशी चर्चा सुरू आहे. मात्र आपण घाईघाईने अशा निष्कर्षाला येणे चुकीचे ठरेल असे उज्वल निकम म्हणाले आहेत. साक्षीदाराने केलेले आरोपांच्याबद्दल विचारपूस करणे म्हणजे चौकशी सुरू नाही आणि समीर वानखेडे यांच्यावर अद्याप तसे कोणतेही आरोप ठेवण्यात आले नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
'कालचक्र सुरूच राहणार'