नागपूर : कोरोनासारख्या माहामारीत जीवनदायी ठरणारी कोरोनाची लस बनवताना अनेक शास्त्रज्ञांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. या शास्त्रज्ञांप्रमाणेच माकडांनीही कोरोना लसीच्या संशोधनात योगदान देत महत्वाची भूमिका बजावली आहे. स्वदेशी बनावटीच्या कोव्हॅक्सिन या लसीच्या संशोधनात नागपुरातील माकडांचे योगदान महत्वाचे ठरले आहे. त्याचाच हा खास रिपोर्ट..
कोव्हॅक्सिनच्या संशोधनात नागपुरातील माकडांनी दिले बहुमूल्य योगदान!
शास्त्रज्ञांप्रमाणेच माकडांनीही कोरोना लसीच्या संशोधनात योगदान देत महत्वाची भूमिका बजावली आहे. स्वदेशी बनावटीच्या कोव्हॅक्सिन या लसीच्या संशोधनात नागपुरातील माकडांचे योगदान महत्वाचे ठरले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना यावर लस बनवण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ अहोरात्र झटत होते. लस बनविताना यातील सर्वात महत्वाचा टप्पा असतो तो लसीच्या चाचणीचा. लस तयार केल्यानंतर त्याची थेट मानवावर चाचणी केली जात नाही. मानवावर चाचणी करण्यापूर्वी प्राण्यांवर चाचणी करून लसीच्या सुरक्षिततेविषयी पडताळणी केली जाते. देशात कोव्हॅक्सिन या लसीचीही मानवी चाचणीपूर्वी माकडांवर चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी नागपुरातील खास प्रजातीच्या माकडांची निवड शास्त्रज्ञांनी केली होती.
ट्रान्झिट सेंटरकडून शास्त्रज्ञांना मदत
जून 2020 मध्ये सर्वत्र लॉकडाऊन असताना कोव्हॅक्सिनच्या प्राथमिक चाचणीसाठी संशोधनासाठी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थएला (एनआयव्ही) काही माकडांची गरज होती. यासाठी मानवाशी बहुतांश बाबतीत साधर्म्य असणाऱ्या विदर्भातील विशिष्ट प्रजातीच्या माकडांची निवड करण्यात आली. ही माकडे चाचणीसाठी मिळविण्याकरीता नागपूरच्या ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरची मदत घेण्यात आली. चाचणीसाठी शास्त्रज्ञांना या प्रजातीच्या नैसर्गिक अधिवासातील माकडांची गरज होती. याची माहिती शास्त्रज्ञांनी ट्रान्सिट सेंटरला दिली. यानंतर सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी अथक परीश्रम घेत नैसर्गिक अधिवासातील ही 12 माकडे पकडून आणत ती पुण्याला पाठविली. याच माकडांवर कोव्हॅक्सिनची पहिली चाचणी करण्यात आली.
या संशोधकांत 'रिसेस मकैक'ची निवड का?
लसीचा संशोधन करताना एनआयव्हीकडून 'रिसेस मकैक'ची निवड करण्यात आली. या माकडांमध्ये आणि मानवाच्या शरीरात अनेक बाबतीत जैविक साधर्म्य आढळून येते. त्यामुळेच या माकडांची निवड या चाचणीसाठी करण्यात आली. चाचणीसाठी शास्त्रज्ञांना बंदिस्त अधिवासातील माकडे नको होती. नैसर्गिक अधिवासातील माकडांचीच त्यांना निकड होती. त्यामुळे यासाठी ट्रान्झिट सेंटरकडून शास्त्रज्ञांना मदत करण्यात आली.
चाचणीनंतर चार माकडे पुन्हा नैसर्गिक अधिवासात
चाचणीनंतर यातील 4 माकडे परत आली असून त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले आहे. या माकडांना जंगलात सोडल्यानंतर कुठंलाही धोका निर्माण होणार नाही याची चाचपणी केल्यानंतर त्यांना परत नागपूरात पाठवण्यात आले. विशेष म्हणजे ही सर्व माकडे सुस्थितीत आहेत. दरम्यान, यापैकी काही माकडे अजूनही संशोधन केंद्रावर असून त्यांचे निरीक्षण केले जात आहे. लसीच्या संशोधनात महत्वाची भूमिका बजावणारी माकडे एक प्रकारे मानवासाठी संकट मोचकच ठरली आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.