नागपूर- राज्य सरकारचे दोन मंत्री अरविंद बनसोड मृत्यू प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली. या प्रकरणाच्या चौकशी अधिकाऱ्यांच्या निलंबन करण्यात यावे, असेही ते माध्यमांशी बोलताना म्हणाले.
या प्रकरणात अॅट्रॉसिटी प्रकरण दाखल झाल्यानंतर सरकारकडून देण्यात आलेली नुकसानभरपाई ही कमी आहे. शिवाय त्यासाठीचा चेक पीडित कुटुंबाला द्यायला राज्य सरकारचे दोन मंत्री गेले होते. हे एका प्रकारे पीडित कुटुंबावर दबाव आणण्याचा प्रकार असल्याची टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. नितीन राऊत व गृहमंत्री अनिल देशमुख हे या प्रकरणात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. सोबतच या प्रकरणातील मुख्य साक्षीदार राऊत हा वेळोवेळी जबाब बदलत असल्याने त्याला आरोपी बनवावे अशीही मागणी आंबेडकर यांनी केली आहे.