नागपूर -सोमवारी नागपूरात तब्बल तीन ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने कोणत्याही घटनेत जीव हानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहाणी झाल्याची माहिती समोर आली आहे.
धुलीवंदनाच्या दिवशी नागपूरात तीन ठिकाणी आगीच्या घटना पहिली घटना-
आग लागल्याची पहिली घटना ही नागपूर शहरातील मुख्य एसटी स्टॅण्ड (गणेशपेठ) वरील पार्सल कार्यालयाला लागली होती. बस स्थानकाच्या अगदी समोर फायर ब्रिगेडचे क्षेत्रीय कार्यालय आहे, त्या ठिकाणी २४ तास फायर इंजिन उपलब्ध असतात. आग लागल्याची सूचना मिळताच अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या, त्यांनी लगेचच पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळाले. या आगीत कितीचे नुकसान झाले आहे, या संदर्भातील माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, पार्सल कार्यालयात ठेवलेले काही पार्सल जळाल्याची माहिती पुढे आली आहे
दुसरी घटना -
दुसरी घटना ही नागपूर शहरातील सेंट्रल एव्हेन्यू (सीए) मार्गावरील दोसर भवन चौकात घडली आहे. या ठिकाणी ऑटो स्पेअर पार्ट आणि कुशनच्या दुकानांची चाळ आहे. आज सकाळी ऑटो स्पेअर पार्टच्या दुकानात शॉर्ट सर्किट मुळे आग लागली,त्यांनंतर बघता बघता आग शेजारच्या चार दुकानांमध्ये पसरली. कुशनच्या दुकानातील केमिकल आणि स्पेअर पार्टच्या दुकानातील ऑइलमुळे आग लवकर भडकली असा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती समजताच अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले होते. सुमारे तासा भराच्या प्रयत्नांनतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या घटनेत कितीचे नुकसान झाले याचा देखील आकडा अद्याप पुढे आलेला नाही.
तिसरी घटना -
नागपूर काटोल मार्गावरील बोरगाव फेटरी जवळ असलेल्या युनिक ट्रेडिंग कंपनीच्या कापूस जिनिंग मिलला दुपारच्या सुमारास आग लागली होती. आग नेमकी कश्यामुळे लागली या संदर्भात खुलासा झालेला नाही. आग लागल्याची माहिती समजताच वाडी,कळमेश्वर आणि मोहपा येथून अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्यासाठी बोलावण्यात आल्या होत्या. या घटनेत मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.