नागपूर -राज्यात मंगळवार रात्रीपासून महानगरपालिका क्षेत्रांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यावेळी नागपूरमध्ये रात्रीपासून पोलीस प्रशासन तैनात असल्याचे चित्र नजरेस पडत आहे. आज पहिल्याच दिवशी पोलिसांनी बाहेर फिरताना आढळणाऱ्या नागरिकांना संचारबंदीचे पालन करण्याचे आवाहन केले.
ब्रिटनमध्ये असलेल्या नव्या विषाणूमुळे भीतीची वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी खबरदारी म्हणून राज्यातील महानगरपालिका क्षेत्रांमध्ये 5 जानेवारीपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचनेवरून शहरातही या संचारबंदीच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. शहरातील गजबजलेल्या परिसरात पोलीस वाहन फिरत नागरिकांना सूचना देताना दिसून आले.
नागपुरात संचारबंदी लागू होताच पोलीस तैनात; आयुक्तांनी केली पाहणी चौकाचौकात पोलिसांनी नागरिकांना दिल्या सूचना..
शहरात जे प्रमुख चौक आहेत अशा ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत. यावेळी रस्त्यावर फिरताना असणाऱ्या वाहनांना थांबवून त्यांची चौकशी करण्यात आली. तसेच संचारबंदी असल्याची माहिती देऊन उद्यापासून बाहेर पडू नये, असे आवाहनही पोलिसांनी नागरिकांना केले.
पोलीस आयुक्तांनी केली पाहणी, रात्रभर गस्तीवर..
महानगर पालिका क्षेत्रात मंगळवार रात्रीपासून संचारबंदी लागू होताच, व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद केल्याचे चित्र शहरातील गजबजलेल्या परिसरात दिसून आले. यावेळी नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, अतिरिक्त पोलीस आयुक्त , डीसीपी ट्राफिक दिलीप झलके, पोलीस उपायुक्त विनिता साहू या सर्वांनी शहराच्या विविध ठिकाणी पाहणी केली.
हेही वाचा :औरंगाबादमध्ये नाईट कर्फ्यू लागू; रात्री केवळ अत्यावश्यक सेवाच राहणार सुरू