नागपूर -कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागपुरात विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलीस विभागाने कडक कारवाईला सुरूवात केली आहे. यासंदर्भात गृहमंत्र्यांनी रविवारी पोलिसांना कारवाईचे आदेश दिले होते. नियमांचे पालन न करण्यांवर अधिकच कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.
नागपूर शहरातील व्हरायटी चौकासह विविध भागांत पोलिसांनी कारवाईला आज सुरुवात केली आहे. यात विनामास्क फिरणाऱ्यांवर ५०० रुपये तर, बाजारपेठांमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर ५ हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे.
हेही वाचा-'राज्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा; जिल्ह्यांनी आवश्यकतेनुसार आगाऊ मागणी नोंदवावी'
शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस विभागाला रविवारी आदेश दिले होते. बेजबाबदारपणे रस्त्यावर विनामास्क फिरणे, सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. याचबरोबर मुख्य बाजारपेठेच्या कडेला बसणाऱ्या छोट्या व्यावसायिकांनाही ( हॉकर्स ) नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
हेही वाचा-राज्यात गेल्या २४ तासात ५ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू, ३११ पोलिसांना लागण
नवीन नियमांनुसार या व्यावसायिकांना बाजारपेठत वावरावे लागणार आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी रस्त्यावर उतरत कारवाईचा आढावा घेतला. त्याचबरोबर बाजारपेठांमधील व्यापाऱ्यांसोबत संवाद साधत नियमांचे पालन करण्याचे आवाहनही यावेळी पोलिस आयुक्तांनी केला.
बाजारपेठांमधील वाढलेली गर्दी आणि नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याने पोलिस विभागाला ही कारवाई करावी लागत असल्याची पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी माहिती दिली. शहरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी करायचे असेल तर नियमांचे पालन करावेच लागेल असेही आयुक्तांनी सांगितले. दुकानांमधील वाढलेली गर्दी ही कोरोनाला आमंत्रण देणारी आहे. त्यामुळे येणाऱ्या दोन-तीन महिन्यात रुग्णसंख्या वाढू शकते, असा त्यांनी इशारा दिला. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने नियमांचे पालन करून पोलीस विभागाला सहकार्य करा, असे आवाहनही अमितेश कुमार यांनी केले आहे.