महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धार्मिक सलोख्याचा संदेश.. 'श्रीरामा'च्या अंत्यसंस्काराला 'सलमान'चा पुढाकार, हिंदू व्यक्तीच्या अंत्यसंस्कारानंतर सोडला रोजा

अलीकडच्या काळात किरकोळ जातीय व धार्मिक मतभेदातून अनेक ठिकाणी जातीय दंगलींचा उद्रेक झाल्याचे आपण पाहतो. अनेक शहरात जातीयता डोके वर काढू पाहत आहे. मात्र नागपूर येथील मुस्लिम तरुणांनी मात्र धार्मिक एकतेचा आगळावेगळा संदेश द्विगुणित केला आहे. येथे हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या हिंदू व्यक्तीवर अत्यंसंस्कारासाठी कोरोनाच्या भीतीने कोणीही पुढे येईना. तेव्हा मुस्लिम तरुणांनी स्वतः पैसे खर्च करून हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे अंत्यविधी केला आहे

By

Published : Apr 19, 2021, 8:10 PM IST

Updated : Apr 20, 2021, 3:35 PM IST

message-of-religious-harmony
message-of-religious-harmony

नागपूर - कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग संकटात सापडले आहे. एकीकडे लाॅकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत असताना दुसरीकडे वैद्यकीय क्षेत्रातही अनेक ठिकाणी रुग्णांची लूटमार सुरु असल्याच्या बातम्या येत आहे. सर्वत्रच सामाजिक भान हरपल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. परंतु अशा आणीबाणीच्या काळात देखील माणुसकी धर्म जिवंत असल्याचे उदाहरण नागपुरात पाहायला मिळाले.

असे म्हणतात की रक्ताचे नातलग उपयोगात पडणार नाहीत, पण शेजारचे आणि जिवाभावाची मित्रमंडळी संकटाच्या वेळी धावून येतील. मात्र कोरोना महामारीच्या या संकटात हा समज देखील गळून पडला. कोरोनाच्या भीतीपोटी नैसर्गिक मृत्यू झालेल्या मृतदेहाकडे देखील संशयाच्या नजरेतून लोक बघू लागले आहेत.

नातेवाईक व सगे-सोयऱ्यांनीही राखले अंतर -

'श्रीरामा'च्या अंत्यसंस्काराला 'सलमान'चा पुढाकार

अशीच एक घटना नागपूर शहरात घडली आहे. खरबी भागात राहणारे श्रीराम बेलखोडे नामक एका व्यक्तीचा (रविवारी) हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर शेजाऱ्यांनी तर सोडाच सगे-सोयऱ्यांनी देखील भीतीपोटी आपल्या घराचे दार बंद करून घेतले होते. तब्बल पाच तास मृतदेह घरात पडून असल्याची माहिती समजताच सलमान रफिक नामक तरुणाने पुढाकार घेऊन श्रीराम बेलखोडे यांच्यावर हिंदू धर्माच्या पद्धतीने अंत्यसंस्कार केले. सलमान रफिक खान याने आपल्या इतर मित्रांच्या मदतीने अंतिम विधीसाठी साहित्य आणले, स्वतः खांदा दिला व हिंदू रितीनुसार मृतदेहावर दिघोरी स्मशानभूमीत अंतिम संस्कार केले. त्यानंतरच सलमानने रोजा सोडला. सलमान हा शिवसैनिक असून युवासेनेचा पदाधिकारी म्हणून कार्यरत आहे.

कोरोना महामारीमुळे आपलेच नातेवाईक आपले राहिले नाहीत. ज्यांना सर्वात जास्त जवळचे समजले जायचे तेच अंतर राखून आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची हिंमत तुटायला लागली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे माणुसकी देखील जगात शिल्लक राहिलेली नाही, अशी उदाहरणे सर्रासपणे बघायला मिळत असताना नागपूर शहरातील एका मुस्लिम तरुणाने निष्ठूर झालेल्या समाजाला माणुसकीचे दर्शन घडवले आहे. सर्वाना वाटले की श्रीराम बेलखोडे यांचा मृत्यू कोरोनाने झाला असावा. त्यामुळे नातेवाईक, शेजारी, मित्र त्यांच्या घराचा उंबरठा देखील ओलांडायला तयार नव्हते. श्रीराम बेलखोडे यांच्या मृतदेहाजवळ केवळ त्यांची पत्नी, एक मुलगी आणि लहान मुलगा होता. या संकटाच्या वेळी नातेवाईक आणि आजूबाजूच्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली.

हिंदू रिती-रिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार -

श्रीराम बेलखोडे यांचा मृत्यू सकाळी 11 वाजता झाला. दुपारी 4 वाजेपर्यंत त्यांचा मृतदेह तसाच पडून होता. मन हेलावून टाकणारी ही घटना समाजसेवक असलेल्या सलमान रफीक नामक तरुणाला कळाली. रफीकने तडक श्रीराम बेलखोडे यांचे घर गाठले. सर्व परिस्थिती समजून घेतल्यानंतर तिरडीला खांदा देण्यासाठी सुद्धा चार माणसं मिळत नसल्याने रफिकने मशीद कमिटीच्या आपल्या मित्रांना बोलवून घेतले. त्यानंतर लागलीच अंत्यसंस्काराचे साहित्य आणून अंत्ययात्रा काढली. स्मशानभूमीत मृतदेह घेऊन गेल्यानंतर हिंदू रीति-रिवाजाप्रमाणे श्रीराम बेलखोडे यांच्यावर अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्काराचा संपूर्ण खर्च सलमानने केला. एवढंच काय तर हिंदू धर्मातील अंत्यविधी कसा करायचा माहीत नसल्याने त्यांनी लगेच आपल्या हिंदू मित्राला फोन करून सर्व अंत्यविधी कसा करायचा, ते जाणून घेतले आणि हे कार्य पूर्ण केले.

सलमान रफिक खान
मानवता हाच खरा धर्म - सलमान
आज संपूर्ण जग संकटात आहे. या संकटाची झळ नागपूरला देखील सोसावी लागत आहे. या कठीण परिस्थितीत जात, धर्म बाजूला सारून माणूस म्हणून शक्य असेल तितकी मदत करणे माझे कर्तव्य असल्याचे सलमान रफिक म्हणाले आहेत. मला प्रसिद्ध नको म्हणत त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलायला देखील नकार दिला.

सर्वाधिक वाचल्या गेलेल्या टॉप ५ न्यूज-

'श्रीरामा'च्या अंत्यसंस्काराला 'सलमान'चा पुढाकार, हिंदू व्यक्तीच्या अंत्यसंस्कारानंतर सोडला रोजा

अंध आईच्या हातून निसटला मुलगा, पडला रेल्वे ट्रॅकवर, पॉइंटमनने वाचवला जीव

साताऱ्यातील यवतेश्वर घाटात उडी घेऊन १६ वर्षीय युवतीची आत्महत्या, आधारकार्डवरुन पटली ओळख

लॉजमधील हाय-प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, ८ तरुणींसह १० जणांना अटक

नवी मुंबईत दोन भाऊ, बहिणीसह तिघांवर कोयत्याने हल्ला, छेड काढल्याची तक्रार केल्याने केला हल्ला

Last Updated : Apr 20, 2021, 3:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details