नागपूर - अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीसह पाच कैद्यांना कोरोना झाल्यानंतर त्यांच्यावर नागपुरच्या मध्यवर्ती कारागृहातील वेगळ्या बॅरेकमध्ये उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र, आज अरुण गवळीची तब्येत खालावल्याने त्याला उपचारासाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (मेडिकल) मध्ये दाखल करण्यात आले होते. अरुण गवळीला अशक्तपणा जाणवत असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली होती. मात्र, मेडिकल रुग्णालयात गवळीचा वैद्यकीय रिपोर्ट सामान्य आल्याने गवळीला पुन्हा कारागृहात आणण्यात आले आहे.
मुंबई येथील नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या खुन प्रकरणात अरुण गवळी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. तीन दिवसांपूर्वी अरुण गवळीला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. त्यामुळे तेव्हापासून गवळीसह पाच कैद्यांवर कारागृहातील वेगळ्या बॅरेकमध्ये उपचार केले जात होते. मात्र, आज गवळीची प्रकृती खालावल्याने कारागृहातील डॉक्टरांनी त्याला लगेच मेडिकल येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तात गवळीला मेडिकल येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, तपासणीचे अहवाल सामान्य आल्यामुळे गवळीसह पाचही कैद्यांना पुन्हा कारागृहात पाठवण्यात आले असून, आता पुढील उपचार कारागृहातच केले जाणार असल्याची माहिती आहे.