महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागपूर मध्यवर्ती कारागृहात कोरोनाचा प्रवेश, एका अधिकाऱ्यासह ८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

नागपूर मध्यवर्ती कारागृहातील एका अधिकाऱ्यासह आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तुरुंगातील कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाल्याने आता या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची चाचणी करण्यात येणार आहे.

नागपूर मध्यवर्ती कारागृहात कोरोनाचा प्रवेश
नागपूर मध्यवर्ती कारागृहात कोरोनाचा प्रवेश

By

Published : Jun 30, 2020, 10:23 PM IST

नागपूर - गेल्या तीन महिन्यांपासून करोनाच्या संसर्गापासून अलिप्त राहिलेल्या नागपूर मध्यवर्ती कारागृहातही करोनाने प्रवेश केला आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहातील एका अधिकाऱ्यासह ८ कारागृह कर्मचाऱ्यांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आल्याने कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे.

तुरुंगात करोनाचा प्रवेश होऊ नये म्हणून नागपूर मध्यवर्ती तुरुंग लॉकडाऊन करण्यात आले होते. याशिवाय नवे नियम तयार करून ते राबवण्यात आले. या नव्या नियमानुसार नव्या कैद्यांना 14 दिवस तुरुंगाबाहेर तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या तुरुंगात ठेवण्याचे धोरण अवलंबिण्यात आले. सोबतच बंदोबस्तासाठी तुरुंगात कर्मचारी व अधिकारी यांना दोन आठवडे तुरुंगाच्या आत राहण्याचे निर्देश देण्यात आले. या धोरणानुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांची एक बॅच 26 जूनला तुरुंगातून बाहेर आली. तुरुंगाच्या आत असलेल्या एका कर्मचाऱ्याला करोनासदृश लक्षणे दिसू लागली होती.

बंदोबस्त आटोपून बाहेर आलेल्या या कर्मचाऱ्याने घरीच उपचार केले परंतु आराम नसल्याने अखेर त्याने शासकीय मेडिकल रुग्णालयात करोना चाचणी केली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या 30 कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी ८ कर्मचाऱ्यांचा अहवाल आज कोरोना पॉझिटिव्ह आला. यात एका अधिकाऱ्याचाही समावेश आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तुरुंगातील कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाल्याने आता या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची चाचणी करण्यात येणार आहे. तुरुंगाच्या आत असताना कोरोनाच्या कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग कसा झाला, याचे कोडे तुरुंग प्रशासनाला पडले आहे. शिवाय आता तुरुंगातील इतर कर्मचारी व कैद्यांना करोनाचा संसर्गापासून रोखण्याचे आव्हान तुरुंग प्रशासनासोबतच आरोग्य यंत्रणेपुढे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details