नागपूर- नागपूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आणि मृत्युदर कमी होत आहे. एकीकडे आनंदाची बाब असली तरी दुसरीकडे रस्त्यावरची गर्दी पुन्हा चिंता वाढविणारी आहे. यामुळे महानगरलगतच्या शहरातील नगरपालिकांनी सावध राहत प्रतिबंधात्मक उपाय कायम ठेवण्याची गरज आहे, असे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे कामठी बैठकी दरम्यान म्हणाले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी कामठी नगरपरिषदेला गुरुवारी भेट दिली होती, तेव्हा ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, नगर परिषद अध्यक्ष मोहमंद शहाँजहाँ सफाद अन्सारी त्यांच्यासोबत होते.
कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन
नागपूर महानगरांमध्ये विविध खासगी आस्थापनावर काम करणारे कामगार आणि मजूर हे शहराच्या आजूबाजूच्या परिसरात राहणारे आहे. याशिवाय ढाबे, हॉटेल्स, रेस्टॉरंट याठिकाणी काम करणारा वर्गही आसपासच्या परिसरात राहतो. या सर्वांचा मोठ्या प्रमाणात अनेकांशी संपर्क येतो. मंगल कार्यालय, ढाबा, रेस्टॉरंट याठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घ्यावे. ज्यांना लक्षणे दिसत आहेत, त्यांनी काळजी म्हणून कामावर जाण्यास टाळावे. तसेच तपासणी करून घ्यावी. त्रिसूत्रीचे पालन करावे. गर्दीच्या ठिकाणी वेळोवेळी निर्जंतुकीकरण करून घ्यावे, प्रतिबंधात्मक उपाय करावे, असे सांगितले जात आहे.
'अनलॉकनंतरची गर्दी तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणारी'