महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने बघायला श्रम आणि पैसे दोन्ही लागत नाहीत, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

उद्धव ठाकरे पुढील ५० वर्षे मुख्यमंत्रीपदाची स्वप्न बघत असतील तर यामध्ये काहीही गैर नाही, कारण स्वप्न बघायला श्रम आणि पैसा दोन्ही लागत नसल्याचा चिमटा फडणवीस यांनी काढला आहे. आमच्या काळात गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र पाहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर घसरला असल्याचा आरोपही फडणवीस यांनी यावेळी केला.

By

Published : Dec 23, 2020, 5:08 PM IST

Updated : Dec 23, 2020, 5:20 PM IST

devendra fadnavis reaction on nanar project
देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

नागपूर -एका कार्यक्रमात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते, की पुढील ५० वर्ष मीच मुख्यमंत्री असेल, यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आशावादी आहेत, ते स्वप्न बघत असतील तर यामध्ये काहीही गैर नाही, कारण स्वप्न बघायला श्रम आणि पैसा दोन्ही लागत नसल्याचा चिमटा फडणवीस यांनी काढला आहे. याशिवाय त्यांनी जैतापूर प्रकल्प आणि राज्यात आलेल्या गुंतवणुकीच्या मुद्यावरून शिवसेनेला खडे बोल सुनावले.

एफडीआय गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्राची तिसऱ्या स्थानी घसरण -

राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत असल्याचा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. यावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात गुंतवणूक येत असले तर याचा आम्हाला आनंद आहे. मात्र यावर्षी गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर घसरलेला आहे. आमच्या काळात गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र पाहिल्या क्रमांकावर होता. त्यावेळी गुजरात, कर्नाटक आणि दिल्ली या तीन राज्यात आलेल्या एकूण गुंतवणुकीपेक्षाही जास्त गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली होती. आज गुजरातमध्ये १ लाख१९ हजार ५६६ कोटी गुंतवणूक आली आहे तर कर्नाटकमध्ये २७ हजार ४५८ कोटी गुंतवणूक आली आहे आणि आपल्या राज्यात मात्र २७ हजार १४३ कोटींची गुंतवणूक आलेली आहे. आकड्यांच्या बाबतीत महाराष्ट्र हा तिसऱ्या स्थानी घसरला आहे आणि ही चिंतेची बाब असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री आशावादी, माझ्या शुभेच्छा-फडणवीस

मंगळवारी एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मी पुढील ५० वर्ष मुख्यमंत्री राहणार असल्याचा टोला विरोधकांना लावला होता, यावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चिमटे काढले आहेत. मुख्यमंत्री आशावादी आहेत हे चांगलं आहे, त्यांनी स्वप्न बघावेत त्याला श्रम आणि पैसे दोन्ही लागत नाहीत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

नेमका मोबदला कुणाला मिळाला ? -

जैतापूर प्रकल्पाला आता शिवसेनेचा विरोध नसल्याचं वक्तव्य शिवसेना नेत्यांनी केलेलं आहे. जैतापूर प्रकल्पा अंतर्गत प्रकल्प पीडितांना मोबदला मिळाला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आता नेमका मोबदला कुणाला मिळाला हे बघावे लागेल, मात्र शिवसेनेची भूमिका प्रकल्पांच्या बाबतीत मवाळ होत असेल तर स्वागत असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. नाणारच्या बाबतची देखील अशीच भूमिका शिवसेनेची होती. तो प्रकल्प तर या पेक्षाही फायद्याचा ठरला असता. ज्यामुळे महाराष्ट्राचा जीडीपी हा मोठ्या प्रमाणात वाढला असता, असा दावा फडणवीस यांनी केला आहे, मात्र आता शिवसेनेची भूमिका बदलत असेल तर त्याचं स्वागत करायला पाहिजे, असं देखील फडणवीस म्हणाले आहेत.

Last Updated : Dec 23, 2020, 5:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details