नागपूर - सरकार वाचवण्यासाठी परमबीर सिंग यांच्या पत्राकडे दुर्लक्ष करू नये. त्यांनी सादर केलेला चॅट हा सर्वात मोठा पुरावा आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा देण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नौतिक भूमिका घेऊन कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे. या प्रकरणावरून आता राज्यातले वातावरण तापले आहे.
काय म्हणाले फडणवीस -
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्री यांनी 100 कोटी रुपयांचे महिना टार्गेट सचिन वाझे यांना दिले होते, असा आरोप माजी पोलीस आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. दरम्यान, हा प्रकार मुंबई पोलीस दलाची मान खाली घालणारा आहे. या परिस्थितीत गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावाच आणि केंद्रीय तपास यंत्रणेकडून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.