नागपूर- साखळी नेटवर्कींगच्या नावाखाली नागपूरकरांना कोट्यवधीने गंडा घालण्यात आल्याचे आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे. आतापर्यंत 45 तक्रारकर्ते समोर आले असून त्यांची 'बाईक बोट' योजनेच्या नावाने एकूण 1 कोटी 5 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही प्राथमिक आकडेवारी असली तरी या योजनेत हजारो नागपूरकरांची फसवणूक झाली असावी आणि त्याचा आकडा अधिक मोठा असण्याची शक्यता आहे.
नागपुरात "बाईक बोट'च्या नावे कोट्यवधीची फसवणूक; चेन नेटवर्कींगच्या माध्यमातून हजारोंना गंडा
'बाईक बोट' योजनेच्या नावाने तब्बल 1 कोटी 5 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना नागपुरात उघडकीस आली आहे. ही प्राथमिक आकडेवारी असली तरी या योजनेत हजारो नागपूरकरांची फसवणूक झाली असावी आणि त्याचा आकडा अधिक मोठा असण्याची शक्यता आहे.
मेसर्स गरवित इनोव्हेटिव्ह प्रमोटर लि. नावाच्या कंपनीने बाईक बोट नावाची स्किम सुरू केली होती. नागपूरकरांना ऑक्टोबर 2018 मध्ये या योजनेसंदर्भात माहिती मिळाली. एकाकडून दुसऱ्याला या योजनेची माहिती होत गेली. ऑनलाईन मिळालेल्या माहितीनुसार 2010 पासून ही कंपनी सुरू असून 2017 मध्ये बाईक बोट योजना सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत एका वर्षासाठी 62 हजार 100 रुपये एकरकमी गुंतविल्यास दरमहा 9 हजार 765 रुपये परतावा मिळणार होता. या गुंतवणुकीतून संबंधिताच्या नावे 1 इलेक्ट्रिकल मोटार सायकल बुक करुन कंपनीकडून भाडे तत्वावर चालविण्यात येणार होती. चालक, मेंटनन्स, इंन्शुरन्स असा सर्व खर्च कंपनीच करणार होती. नेटवर्कींग स्वरूपात आणखी काही गुंतवणूकदार आपल्या सोबत जोडल्यास प्रतिजोडी 4 हजार 590 रुपये अतिरिक्त मिळणार होते. सुरूवातीला काही रक्कम गुंतवणुकदारांना मिळाली. मात्र त्यानंतर एकही दमडी गुंतवणुकदारांना परत देण्यात आली नाही.
गुंतवणूकदारांनी याबाबतची अधिक माहिती काढली असता गरवित इनोव्हेटिव्ह प्रमोटर कंपनीचा मालक संजय भाटी आणि त्याच्या अन्य 12 साथीदारांविरूध्द उत्तर प्रदेशातील गौतम बुध्दनगरातील दादरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे 45 गुंतवणुकदारांनी पुढे येऊन गुन्हेशाखेच्या आर्थिक विभागाकडे तक्रार केली. बाईक बोट स्किममध्ये हजारो नागपूरकरांची फसवणूक केली गेली असण्याची दाट शक्यता आहे. यात अगदी पोलीस कर्मचाऱ्यांनाही गंडा घालण्यात आला आहे. नागपुरात यापुर्वीही चेन नेटवर्कींच्या माध्यमातुन काही कंपन्यांनी गंडा घातला होता. मात्र, पैशाच्या लोभापोटी गुंतवणुकदार अशा कंपन्यांच्या आमिषाला बळी पडताना दिसत आहे.