नागपूर -व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये एखादी आक्षेपार्ह पोस्ट ग्रुपमधील सदस्यांनी केल्यास, त्या पोस्टसाठी ग्रुप अॅडमिनला जबाबदार धरून त्याच्यावर कारवाई करता येणार नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. या निर्णयाने ग्रुप अॅडमिनला दिलासा मिळाला आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय न्यायमूर्ती झेड. ए. हक आणि अमित बोरकर यांनी दिला.
गोंदिया जिल्ह्यातील किशोर तारोणे यांनी एक व्हाट्सअॅप ग्रुप तयार केला होता. या ग्रुपमध्ये महिला आणि पुरूष असं दोघांनाही अॅड करण्यात आले होते. दरम्यान या ग्रुपमध्ये त्यातीलच एका सदस्याने महिलांच्या संदर्भात एक पोस्ट टाकली होती. ही पोस्ट महिलांचा अपमान करणारी असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच या पोस्टविरोधात एका महिला सदस्याने अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान प्रथम श्रेणी न्यायालयात हे प्रकरण गेले असता, किशोर तारोणे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून, ही तक्रार रद्द करण्याची न्यायालयाला विनंती केली.