मुंबई -मुंबई विद्यापीठातील शैक्षणिक विभाग आणि सलंग्नित महाविद्यालयात पदवी आणि पदव्यूत्तर प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रिये संबंधी महाविद्यालये आणि विद्यापीठ विभागांना मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठाच्या नावनोंदणी, पात्रता व स्थलांतर प्रमाणपत्र विभागामार्फत जिल्हा आणि क्षेत्रीय स्तरांवर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. ४ ते १३ मे २०२२ दरम्यान मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत्रातील विविध महाविद्यालयांसाठी या कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. या कार्यशाळेत शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची पात्रता, नावनोंदणीचे अर्ज, अनुषंगिक कागदपत्रे या अनुषंगाने शंकाचे निरसन करण्यात येईल. त्याचबरोबर शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या वर्षीच्या प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणीच्या प्रक्रीयेबाबत महाविद्यालयांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
अधिकारी मार्गदर्शन करणार :मुंबई विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. लीलाधर बन्सोड यांनी सांगितले कि, मुंबई विद्यापीठामार्फत अनेक वर्षांपासून पदवीच्या प्रथम वर्षाची प्रवेशपूर्व नावनोंदणीची प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबवली जाते. तसेच मागील वर्षांपासून विद्यापीठ विभागातील पदव्यूत्तर प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीच्या प्रक्रीयेला सुरुवात करण्यात आली आहे. या प्रक्रियेत प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांची पात्रता, स्थलांतर आणि अनुषंगिक इतर प्रशासकीय बाबींसंदर्भात महाविद्यालये व विद्यापीठ विभागांना योग्य ते मार्गदर्शन मिळावे यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते. या कार्यशाळेला पात्रता व स्थलांतर प्रमाणपत्र विभागातील उपकुलसचिव आणि कर्मचारी वर्गासंह एमकेसीएल अभीकरणातील अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.