मुंबई- टोकियो ऑलिंपिक मध्ये तिरंदाजी खेळ प्रकारांमध्ये देशात नावलौकिक वाढवणाऱ्या खेळाडू प्रवीण जाधव यांना जमिनीच्या वादातून धमकी मिळत असल्याची तक्रार प्रवीण यांनी केली होती. त्या तक्रारीची दखल आता राज्यातील क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी घेतली आहे. या धमकी प्रकरणी लवकरात लवकर चौकशी केली जाईल, असे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी स्पष्ट केले आहे.
तिरंदाज प्रवीण जाधव हे सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यामध्ये राहतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी यश संपादन केले आहे. प्रवीण जाधव हे सरडे गावात एका झोपडीत राहत होते. मात्र लष्करात सामील झाल्यानंतर प्रवीण जाधव यांचे कुटुंब झोपडी असलेल्याच ठिकाणी आता पक्के घर बांधत आहे. या घराच्या दुरुस्तीचे काम प्रवीण जाधवचे कुटुंबीय करत आहेत. मात्र घराची दुरुस्ती करू नये म्हणून जाधव यांच्या शेजाऱ्यांनी प्रवीण जाधव यांच्या वडील आणि काकांना धमकी दिली, अशी तक्रार प्रवीण जाधव यांनी लष्करी अधिकाऱ्यांकडे केली होती.
तिरंदाज प्रवीण जाधव यांना मिळालेल्या धमकी प्रकरणाबाबत चौकशी करणार - क्रीडा मंत्री केदार
प्रवीण जाधव सातारा जिल्ह्यातील सारडे येथे राहतो. त्याचे कुटुंबीय घराची दुरुस्ती करू इच्छित आहेत. पण घराची दुरुस्ती करू नये, यासाठी जीवे मारण्याची धमकी प्रवीणच्या कुटुंबीयांना शेजाऱ्यांकडून देण्यात आली.
सध्या प्रवीण जाधव हे ओलंपिक मध्ये भाग घेण्यासाठी टोकियोमध्ये आहेत. मात्र आपण घरी नसताना अशा प्रकारे आपल्या वडील आणि काकांना धमकी दिली जात असल्याची तक्रार त्यांनी लष्करी अधिकाऱ्यांकडे केली होती. याची दखल आता क्रीडामंत्री सुनील केदार यांनी घेतली असून, यापुढे प्रकरणाबाबत माहिती मागवून प्रवीण जाधव यांना कोणताही त्रास होणार नाही, याबाबत काळजी घेतली जाईल अशी ग्वाही त्यांच्याकडून देण्यात आली आहे. तसेच जागेसंदर्भात जर, काही वाद असेल तर महसूल विभागाशी बोलून तो वादही सोडवला जाईल, असेही सुनील केदार यांनी सांगितले आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रवीण जाधवला पदक जिंकता आलं नाही. पण त्याची कामगिरी उल्लेखनीय ठरली. प्रवीण टोकियोतून माघारी परतल्यानंतर थेट हरयाणा येथे रवाना झाला. पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेसाठी हरयाणात भारतीय खेळाडूंचे सराव शिबीर होणार आहे.