मुंबई - सातारा जिल्ह्यातील भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणाच्या विषयासह इतर विषयांवरही दोघांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली.
'वडीलकीच्या नात्याने लक्ष घालावे'
खा. उदयनराजे यांनी यापूर्वी मराठा आरक्षण प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. मराठा आरक्षणात वडीलकीच्या नात्याने लक्ष घालावे, यासंबंधीच्या खटल्यामध्ये कोणत्याही प्रकराचा वेळकाढूपणा आणि हलगर्जीपणा करू नये, अशी विनंती राज्य सरकारला देवून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा तसेच विविध मुद्द्यांवर श्वेतपत्रिका काढण्याचा आदेश राज्य सरकारला द्यावा, अशी मागणी उदयनराजे यांनी शरद पवार यांच्याकडे केली होती.
'...तर उद्रेक होईल'
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने गंभीरपणे लक्ष न दिल्यास उद्रेक होईल, असा इशाराही त्यांनी दिला होता. आता त्यांनी मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यांच्या या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.