मुंबई - मुंबईत विविध प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पाच्या आड येणारी झाडे तोडली जातात. मुंबईत मेट्रो, रेल्वे, पूल, नाला व इमारत बांधकामांच्या मध्ये येणाऱ्या ३५५ झाडांची कत्तल केली जाणार ( Tree felling in Mumbai ) आहे. ४१६ झाडे पुनरारोपित केली जाणार आहेत तर १५३० झाडे जैसे थे स्थितीत ठेवण्यात येणार आहेत. याबाबतचे १७ प्रस्ताव महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडे ( BMC Tree Authority Committee ) सादर करण्यात आले आहेत.
मेट्रोसाठी ११९ झाडांची कत्तल
मुंबईत मोठ्या प्रमाणात मेट्रो रेल्वे, पूल, नाला व इमारत बांधकामांचे प्रकल्प सुरू आहेत. यामधील वांद्रे येथे मेट्रो रेल्वे ( Wandre Metro Railway ) कामाच्या अंतर्गत ४४ झाडे कापण्यात येणार आहेत तर ४२ झाडे पुनररोपित करण्यात येणार आहेत. तसेच, दहिसर येथे मेट्रो रेल्वे कामाच्या अंतर्गत ७५ झाडे कापण्यात येणार असून, १०८ झाडे पुनरारोपित करण्यात येणार आहेत. त्यामुळे मेट्रो रेल्वेच्या कामाच्या अंतर्गत ११९ झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. तर एकूण १५० झाडे मूळ जागेवरून हटवून ती दुसऱ्या ठिकाणी पुनरारोपित करण्यात येणार आहेत.
पूल, रेल्वेसाठीही झाडांची कत्तल
मलबार हिल तसेच अंधेरी याठिकाणी पुलांच्या बांधकामासाठी ४८ झाडांची कत्तल करण्यात येणार आहे तर ६७ झाडे हटवून पुनरारोपित करण्यात येणार आहेत. देवनार येथे बंगल्याच्या कामासाठी ६ झाडांची, सांताक्रूझ येथे रेल्वेच्या ६ व्या लाईनच्या कामासाठी ३३ झाडांची तर वडाळा ट्रक टर्मिनल्स येथे नाल्याच्या बांधकामासाठी ४२ झाडांची कत्तल केली जाणार आहे. याबाबतचे प्रस्ताव पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे सदर प्रस्तावावरून या बैठकीत पालिका प्रशासन आणि समिती सदस्य यांच्यात वाद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.