मुंबई -औरंगजेबासारखा मोगल बादशाहा अनेक प्रयत्न करूनही पंढरीच्या आषाढी वारीची यात्रा बंद पाडू शकला नाही. ती परंपरा मोडण्याचे पाप आघाडी सरकारने करू नये. कोरोनासारख्या आजाराशी लढा देण्यासाठी समाजाला मानसिक बळ देण्याचे सामर्थ्य आषाढी वारीमध्ये आहे. तेव्हा यावर्षी सरकारने वारीला परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी मागील वर्षी देशव्यापी टाळे बंदी लागू केली होती. वारकरी संप्रदायाने गतवर्षी आषाढी-कार्तिकी अशा सर्व यात्रा रद्द करण्याचा राज्य शासनाचा निर्णय स्वीकारला आणि सरकारला सहकार्य केले. समुहाने होणारे सर्व आध्यात्मिक व धार्मिक उत्सव गेल्या वर्षी रद्द करण्यात आले. आषाढी यात्रेचे हिंदू धर्मात अन्यनसाधारण महत्त्व आहे. हेच महत्त्व लक्षात घेऊन औरंगजबाने सुद्धा वारी बंद पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र वारकऱ्यांनी त्याला न जुमानता वारीची पंरपरा सुरूच ठेवली. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारने वारी रद्द करण्याचे पाप करू नये, वारीबाबत असलेल्या मराठी समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेऊन वारीला परवानगी द्यावी, अशी मागणी माधव भंडारी यांनी केली आहे.