मुंबई - आपल्या सहजसुंदर आणि निखळ विनोदाने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारे जेष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांना ९ ऑगस्ट रोजी सकाळी देवाज्ञा झाली. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांना आपल्या गिरगावातील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. रंगभूमीवरील विनोदी चेहरा लोप पावल्यामुळे मराठी मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे.
प्रदीप पटवर्धन यांना लहानपणापासूनच अभिनय, नकला करण्याची आवड होती. गिरगावात राहत असल्यामुळे त्यांना आपली ही आवड जोपासण्यात मदत झाली. गणेशोत्सवांतून ते आपल्यातील अभिनयाचे, खासकरून विनोदी स्वभावाचे, विविध पैलू लोकांसमोर सादर करायचे. पुढे त्यांनी अनेक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा गाजविल्या. रिझर्व्ह बँकेत त्यांनी काही काळ नोकरी केली. त्याकाळी रिझर्व्ह बँकेतर्फे आंतर बँक एकांकिका स्पर्धा भरविल्या जात आणि त्यात काम करणे आणि ‘नंबरात’ येणे मानाचे समजले जाई. त्यासुमारास रमेश पवार लिखित आणि भारत तांडेल दिग्दर्शित ‘टेम्पल एम्प्लॉयमेंट’ या एकांकिकेत पटवर्धन यांनी नायकाची मध्यवर्ती भूमिका केली होती ज्यासाठी त्यांना आणि एकांकिकेला अनेक पारितोषिके मिळाली होती. त्यानंतर त्यांनी बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी धरली आणि शेवटपर्यंत सोडली नाही. परंतु त्यांनी अभिनयाची कासही सोडली नाही.
बँक ऑफ इंडिया तर्फे त्यांनी अनेक एकांकिकांमधून आंतर बँक एकांकिका स्पर्धांत भाग घेतला आणि बँकेला अनेक पुरस्कार मिळवून दिले. त्यांचा विनोदी स्वभाव आणि सर्वांशी मिळून मिसळून राहण्याची वृत्ती यामुळे प्रदीप पटवर्धन बँकेत राहूनही आपली अभिनयाची आवड जोपासू शकले. बँकेतील त्यांचे एक वरिष्ठ अधिकारी सुहास पाथरे म्हणाले की, “प्रदीप पटवर्धन अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते. तसेच व्यावसायिक नाटकांत काम करताना मिळालेल्या स्टार पदाचा त्यांनी कधीही दुरुपयोग करून घेतला नाही. बँकेतील रुक्ष वातावरणात त्यांच्या विनोदी स्वभावामुळे तणाव अजिबात जाणवत नसे. बरीच वर्षे ते सकाळच्या ७ च्या शिफ्ट ला येत असत आणि दुपारपर्यंत काम करून नंतर आपल्या इतर जबाबदाऱ्या निभावत असत. त्यांचा अभिनय म्हणजे मनोरंजनाचा परिपूर्ण आविष्कार होता. त्यांच्या निधनाने खूप दुःख झाले असून सर्वांना हसत ठेवणारा माणूस आज आपल्यात नाही याची खंत आहे. ईश्वर मृतात्म्याला शांती प्रदान करो ही सदिच्छा.”