मुंबई -अभिनेत्री कंगना रणौतने स्वातंत्र्य लढ्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरुद्ध प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कुणाल राऊत यांनी पोलिसात तक्रार केली असून राणावत यांच्या अटकेची मागणी केली आहे. कंगना यांच्याविरुद्ध देशद्रोहाची कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. शुक्रवारी संध्याकाळी मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी कंगना रणौत विरुद्ध तक्रार दाखल केली.
यापूर्वीही अशा पद्धतीची वक्तव्ये -
मुंबईसह राज्यभरात कंगना विरोधात पोलिसांत तक्रारी; अटकेची मागणी
भारताला 1947 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य हे भीक म्हणून मिळाले होते, खरे स्वातंत्र्य तर 2014 मध्येच मिळाले, या वक्तव्यावरुन अभिनेत्री कंगना रणौत आता वादात सापडली आहे. या प्रकरणी कंगना आता चांगलीच अडचणीत आली आहे. तिच्या विरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल झाली असून, तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कंगना रणौत सतत वादग्रस्त वक्तव्ये करीत असतात. देशाला 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हे भीक असून खरे स्वातंत्र्य हे 2014 साली मिळाले,असे अतिशय आक्षेपार्ह व देशविरोधी त्यांनी केले. यापूर्वीही त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे सेनानी महात्मा गांधी यांचा मारेकरी आणि हिंदूत्ववादी अतिरेकी नाथुराम गोडसेचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला आणि राष्ट्रपिता गांधी व देशाचा अपमान केला आहे," असे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसांत तक्रार दाखल -
भारत सध्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करीत असताना कंगनाचे हे वक्तव्य हजारो शहीद, लाखो स्वातंत्र्य सैनिक, क्रांतिकारक यांचा अपमान करणारे आहे. काँग्रेसच्या नेतृत्वात स्वातंत्र्याचा लढा लढण्यात आला. मी स्वतः स्वातंत्र्य संग्राम सैनिकाचा नातू आहे. प्रदेश युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष या नात्याने मी आज कंगनाच्या वक्तव्याविरूद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे, असे ते म्हणाले.
राणावत यांना तत्काळ अटक करा -
देशद्रोह, राष्ट्रीय प्रतीकांचा अपमान, राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अपमान, दोन समुहांमध्ये भांडणे लावून हिंसेचा प्रसार करण्यासाठी चिथावणी देणे, शांतता व सौहार्दाचा भंग करणे, देशात अशांतता निर्माण करून कायदा-सुव्यवस्था बिघडवणे, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर पुरूषांचा व स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करणे, यासारख्या बेकायदेशीर कृत्यांसाठी उचित कलमांखाली गुन्हे नोंदवून कंगना राणावत यांना तात्काळ अटक केली जावी, अशी मागणी प्रदेश युवक काँग्रेसच्यावतीने राऊत यांनी पोलिसांकडे केली आहे.