मुंबई -कोरोना महामारी असली तरीदिवाळी सणानिमित्त प्रवाशांची बसच्या गर्दीत वाढ होणे अपेक्षित आहे. त्यानुसार वाढती मागणी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने 11 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत दररोज सुमारे 1 हजार विशेष जादा फेऱ्यांचे नियोजन केल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली.
दिवाळी सणानिमित्त जादा फेऱ्यांचे बसर राज्यभरातील प्रमुख बसस्थानकावरून सुटणार आहेत. बसची तिकीटे टप्प्याटप्प्याने आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली आहे.
कोरोना महामारीत नियम पाळण्याचे एसटी प्रशासनाला निर्देश
एसटी महामंडळामार्फत दिवाळी सणानिमित्त प्रवासी गर्दी लक्षात घेऊन दरवर्षी नियमित बस फेऱ्या व्यतिरिक्त जादा फेऱ्या सोडण्यात येतात. यंदाही एसटी महामंडळाने जादा बस फेऱ्या सुरू करण्याचे नियोजन केले आहे. राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार कोविड-19चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व सूचना व नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश एसटी प्रशासनाला देण्यात आले आहेत. दिवाळी सणानिमित्त होणारी जादा वाहतूक निर्विघनपणे पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सूचना महामंडळाच्या वाहतूक विभागामार्फत स्थानिक आगाराला दिल्याचे अनिल परब यांनी सांगितले.
आगाऊ आरक्षणासाठी प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन परिवहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान टाळेबंदीमुळे एसटी महामंडळाला मोठा तोटा सहन करावा लागला आहे. अशा परिस्थितीत एसटी महामंडळाला दिवाळी सणादरम्यान चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. राज्यात 18 सप्टेंबरपासून पूर्ण आसन क्षमतेने एसटी प्रवास सेवा सुरू करण्यात आली आहे.