मुंबई - नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसचे नवीन प्रदेशाद्याक्ष नाना पटोले होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच नवीन विधानसभा अध्यक्ष कोण होणार याची चर्चा देखील सुरू झाली आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षपद हे दिल्लीतून ठरवले जाणार असल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.
हेही वाचा -नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा
नवा विधानसभा अध्यक्ष कोण?
गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचे नवीन प्रदेशाद्याक्ष कोण असणार यासाठी काही काँग्रेस नेत्यांची नावे आघाडीवर होती. आता ती चर्चा थांबली आहे. मात्र विधानसभा अध्यक्ष पदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव चर्चेत आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले त्यावेळी देखील विधानसभा अध्यक्ष पदाची धुरा पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सोपावणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यावेळी नाना पटोले यांच्या नावावर दिल्लीतून होकार आल्याने पृथ्वीराज चव्हाण यांना अध्यक्ष होता आलं नाही. विधानसभा अध्यक्ष कोण होणार या संदर्भात निर्णय घेण्याची वेळ आल्यावर महाविकास आघाडीचे नेते देखील बैठक करून नवीन अध्यक्ष कोण हे ठरवणार असल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली.