मुंबई - कोरोनामुळे (Covid-19) राज्य सरकारची आर्थिक घडी विस्कटलेले असताना आता राज्यातील अर्धा डझन मंत्री दुबईची (Dubai tour) वारी करणार आहे. शिवाय मंत्र्यांसोबत विविध खात्याचे ५४ वरिष्ठ अधिकारी (Senior officer) देखील जाणार आहेत. राज्याच्या तिजोरीवर याचा भार पडणार असल्याने मंत्र्यांची ही वारी वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.
प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत -
दुबईमध्ये येत्या 28 नोव्हेंबरपासून एक्स्पो (Expo in Dubai) सुरू होणार आहे. देश-विदेशातील लोकप्रतिनिधी एक्स्पोसाठी जाणार आहेत. महाराष्ट्रातील उद्योग, पर्यटन, कृषी विकास, वैद्यकीय शिक्षण आणि महिला व बाल विकास खात्याचे मंत्री (Ministers of Maharashtra) एक्स्पोला भेट देणार आहेत. वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, कृषी मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री विश्वजीत कदम, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, फलोत्पादन राज्य मंत्री आदिती तटकरे यांच्यासह ५४ अधिकारी यात सहभागी होणार आहेत. उद्योग खात्याच्या शिष्टमंडळाकडून (Industry Department) यासाठी परवानगी मागण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे या संदर्भातील प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही.
दौरा ठरणार वादग्रस्त -
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षांपासून विदेश प्रवासावर (Foreign travel) निर्बंध आहेत. कोरोना आटोक्यात आल्यानंतर मंत्र्यांना विदेश वारीचे वेध लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर दुबई एक्स्पोची संधी चालून आल्याने या मंत्र्यांनी तिचा फायदा घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आधीच जीएसटीपोटी (GST) केंद्राकडे कोट्यवधी रुपये अडकून आहेत. कोरोनामुळे राज्य सरकारचा खर्च अनेक पटीने वाढला आहे. उद्योग-धंदे, व्यापार ठप्प झाल्याने मिळणारे उत्पन्नही कमी झाले आहे. विकास कामांना कात्री लावण्यावर सरकारने यामुळे भर दिला आहे. अशातच आता राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील ६ मंत्री आणि विविध खात्याचे ५४ अधिकारी दुबईला निघाले आहेत. त्यामुळे हा दौरा वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.